राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीमध्ये ठरणार आहे. या मतमोजणीचे अनेक निकाल हाती आले असून राज्यामध्ये सर्वच पक्षांना वेगवेगळ्या ठिकाणी यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे. कोकणामध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये मोठी चुरस दिसून येत आहे. कोकणामधील कणकवली तालुक्यात शिवसेनेने भाजपाला म्हणजेच राणे कुटुंबाला धक्का दिला असला तरी दुसरीकडे मालवणमध्ये भाजपापणे त्याची परफेड केली आहे. मालवणमधील सहापैकी पाच ग्रामपंचायतींवर कमळ फुललं आहे. मलावणमधील हा पराभव शिवसेनेबरोबरच स्थानिक शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालवण कुडाळमध्ये भाजपाची मुसंडी

मलावणमधील चिंदर, पेंडुर, कुंकवळे, मसदे आणि गोळवन या ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. तर आवडवली या एकमेव ग्रामपंचायतीवर शिवसेनेला विजय मिळाला आहे. मलावणमध्ये शिवसेना आमदार वैभाव नाईक आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत होती. अखेर मालवणमध्ये भाजपा हा मोठ्या फरकाने शिवसेनेवर भारी पडल्याचे चित्र निवडणुकीमधून स्पष्ट झालं आहे. कुडाळमध्येही वैभव नाईक यांना जबरदस्त धक्का देत भाजपाने मुसंडी मारली आहे. एकूण १५ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला सहा  तर भाजपचा नऊ ग्रामपंचायतीत मोठा विजय मिळला आहे.

आणखी वाचा- Gram Panchayat Results: “राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि…”; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

कणकवलीमध्ये राणेंना धक्का

भाजपा आणि नितेश राणे यांना सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधील चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या सर्व सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये तिन्ही सदस्य शिवसेनेचेच निवडून आले आहेत.  कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेलीय. आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा कणकवली तहसीलदार कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणकवली तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून एक ग्रामपंचायत बिनविरोध झालीय. कणकवली हा आमदार नितेश राणेंचा गड मानला जातो त्यामुळेच येथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कणकवलीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेलं राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली.

आणखी वाचा- Gram Panchayat Results: चंद्रकांत पाटलांच्या गावात शिवसेनेनं सत्तांतर ‘करुन दाखवलं’; भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मूळ गावात भगवा

सावर्डेमध्ये राष्ट्रवादी

रत्नागिरीमधील सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. स्थानिक आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. सर्व नऊच्या नऊ जागांवर निकम पॅनलचे उमेदवार विजयी झालेत. एकूण १७ ग्रामपंचायत उमेदवारांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उरलेल्या नऊही जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra gram panchayat results big blow to shivsena mla vaibhav naik as bjp sweeps in malvan and kudal ncp in ratnagiri scsg
First published on: 18-01-2021 at 12:55 IST