मान्सूनपूर्व कामाचा आढावा म्हणून मुंबई महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तसेच पावसाच्या आधी महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. आता मुंबईतील नालेसफाईवरून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा, शिवसेना शिंदे गटात चांगलंच राजकारण तापलं आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?, अशी बोचरी टीका केली आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

“मुंबई शहरातील नालेसफाईच्या पाहणीचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. आता उत्तर मुंबई या विभागात आणि दहिसर नदीवर पाहणी करण्यासाठी आम्ही जात आहोत. प्रत्यक्षात महापालिका नालेसफाईची जी आकडेवारी सांगत आहे आणि प्रत्यक्षात नाल्यांमध्ये असलेला गाळ याचा मेळ बसत नाही. त्यामुळे कामात सुधारणा करणं गरजेचं आहे. मुंबई महापालिका आणि कंत्राटदार जो पर्यंत १०० टक्के काम करत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्ष याचा पाठपुरावा करेल”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “आशिष शेलार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये वाद”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर महापालिकेने नालेसफाईसंदर्भातील प्रेझेंटेशन दिले आहे. त्यामुळे तुम्ही या कामावर समाधानी आहात का? या प्रश्नावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीचे स्वागत करतो. जबाबदार मुख्यमंत्री आणि बेजबाबदार मुख्यमंत्री या मधील हा फरक आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते वर्षा निवासस्थानी बसून नाल्यांवर फिरत होते. घरात बसून ते नालेसफाईबाबत माहिती घ्यायचे. त्यामुळे बेजबाबदार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काम केलं”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: महापालिकेत जातात. त्यामुळे ते जबाबदार मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. मात्र, अपेक्षा हीच आहे की, सर्वांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे या कामाला गती मिळाली. पण उद्धव ठाकरे कुठे आहेत? मर्दाची भाषा करायची, मी आणि माझा पक्ष मुंबईकरांसाठी आहे असं म्हणायचं आणि आता उद्धव ठाकरे लंडनमधील नाले पाहायला गेले का? उद्धव ठाकरे लंडनचे नालेसफाई का पाहत आहेत? मुंबईतील नाले पाहायला उद्धव ठाकरे का आले नाहीत? त्यांचा पक्ष हा पुतना मावशीचा पक्ष आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी लंडनमधील नालेसफाईचे आकडे दाखवावेत”, अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी केली.