राज्यात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णसंख्या ४० हजारांच्या घरात आहे. मात्र यात काल काहीशी घट दिसून आली. काल दिवसभरात राज्यात ३९,२०७ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. तर राज्यात काल एकाही नव्या ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोना परिस्थितीबद्दल एक दिलासादायक बातमी दिली आहे.
राज्यातल्या दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आता कमी होत चालल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. एएनआयशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातल्या दैनंदिन करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे आणि राज्यातली एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे. फारच कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत आहे. चाचण्यांच्या संख्येत वाढ करणं आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं यासाठी शासन पूर्ण क्षमतेनं काम करत आहे.
काय आहे राज्यातली करोना परिस्थिती?
राज्यात काल ३९,२०७ नव्या करोनाबाधितांची भर पडली असून ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल३८,८२४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात काल एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आत्तापर्यंत राज्यात १, ८६० ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत, त्यापैकी १,००१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात काल ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.९५ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६८ लाख ६८ हजार ८१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के आहे. सध्या राज्यात २३ लाख ४४ हजार ९१९ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर २९६० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.