राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. मात्र १२ तासांच्या आतच यामधील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. या सर्वांच्या बढतीला स्थगिती देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे चर्चांना उधाण आलं असून नेमकं असं काय घडलं की निर्णय मागे घ्यावा लागला असा प्रश्न विचारला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते अधिकारी कोण आहेत?

राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पत्रामध्ये गृहमंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

Azaan Controversy: भोंग्यांसंबधीचा ‘तो’ निर्णय भोवला?; नाशिक पोलीस आयुक्तांच्या बदलीमुळे चर्चांना उधाण

राजेंद्र माने राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावर कार्यरत होते आणि त्यांना ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती. तर महेश पाटील यांना पोलीस उपायुक्त पदावरुन मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या

संजय जाधव पुण्यातील महामार्ग सुरक्षा पथकात पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची ठाणे शहरात अप्पर पोलीस आयुक्तपदी (प्रशासन) बढती कऱण्यात आली होती. पंजाबराव उगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून पोलीस मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (सशस्त्र पोलीस) बढती देण्यात आली होती. तर दत्तात्रय शिंदे यांनी पालघरमधील पोलीस अधिक्षक पदावरुन मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (संरक्षण व सुरक्षा) बढती देण्यात आली होती.

सरकारचा बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड

“या सरकारने बदल्यांचा पोरखेळ चालवला आहे. या सरकारचा बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, त्याआधी गृहमंत्र्यांची सही असते. आता १२ तासात त्यावर स्थगिती दिली आहे. स्थगिती का दिली याबाबत सरकराने खुलासा केला पाहिजे,” अशी मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे. गेल्यावेळी जे वाझे प्रकरण झालं त्याचीच ही छोटी आवृत्ती असल्याचं आमचं मत आहे असाही आरोप यावेळी त्यांनी केला.

“गेल्यावेळच्या बदलम्यांमध्ये भ्रष्टाचार झाला हे तर सगळं जग मान्य करत आहे. त्याची सीडी आहे, पेन ड्राईव्ह आहेत. म्हणून तर रश्मी शुक्लांना इतका त्रास दिला जात आहे. गुंड, मवाली आणि भ्रष्टाचाराला पाठिशी घालणारं हे सरकार आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra home ministry stay on pormotion of five police officers sgy
First published on: 21-04-2022 at 10:33 IST