Maharashtra Board HSC Result Revaluation Process 2025 : महाराष्ट्रातल्या जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेले बारावीचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. यानुसार महाराष्ट्राचा बारावीचा निकाल जवळपास ९१.८८ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दीड टक्क्यांनी यंदा निकाल कमी लागला असून कोकण विभागानं सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. त्याशिवाय, मुलींनी यंदाच्या निकालातही बाजी मारली आहे. पण जे विद्यार्थी लागलेल्या निकालाने समाधानी नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पूनर्मूल्यांकन, श्रेणीसुधार किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज कसे करता येतील? याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

काय आहेत यंदाचे निकाल?

यंदाचा महाराष्ट्र राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला असून त्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका आहे. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून ८९.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.५८ टक्के असून मुलांची टक्केवरी ८९.५१ टक्के आहे. त्यामुळे यंदाच्या बारावीच्या परीक्षेतही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

कसा कराल श्रेणीसुधार पर्यायासाठी अर्ज?

दरम्यान, जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असूनही त्यांना श्रेणीसुधार करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना येत्या तीन परीक्षा, अर्थात जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६ या तिन्ही वेळी किंवा त्यापैकी एका परीक्षेला बसण्याची संधी असेल. या परीक्षांमध्ये बसल्यानंतर विद्यार्थ्याचे गुण वाढल्यास किंवा कमी झाल्यास आधीची गुणपत्रिका कायम ठेवायची की नव्याने उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका कायम ठेवायची, हे ठरवण्याचा अधिकार विद्यार्थ्याला असेल. त्यासाठी विद्यार्थ्याला सहा महिन्यांची मुदत दिली जाईल. यानंतर दुसरी गुणपत्रिका विद्यार्थ्याने मंडळाकडे परत द्यायची आहे, असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जुलै २०२४ पासून हे बदल करण्यात आले आहेत.

गुणपडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन

दरम्यान, श्रेणीसुधार पर्यायाप्रमाणेच ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत मिळालेल्या गुणांची पुनर्पडताळणी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना कसा अर्ज करता येईल? याबाबतही महाराष्ट्र मंडळाकडून स्पष्टता देण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायांकित प्रती व पुनर्मूल्यांकनासाठीचे अर्ज स्वीकारले जात असल्याचं मंडळाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सर्व नियम, माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या सुविधांसाठीचा अर्ज करताना त्यासाठीचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच करायचं असल्याबाबत बोर्डानं स्पष्ट माहिती दिली आहे. यासाठीचे अर्ज ६ मे ते २० मे २०२५ यादरम्यान स्वीकारले जातील. त्यासाठीचं शुल्क प्रतीविषय ५० रुपये इतकं असेल. शिवाय, उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेतल्याशिवाय, त्या विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठीचा अर्ज करता येणार नाही. त्यामुळे आधी विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी घ्यावी, असंही बोर्डानं स्पष्ट केलं आहे. या फोटोकॉपीसाठीही याच मुदतीत अर्ज करता येणार असून प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ही फोटोकॉपी हस्तपोच, ऑनलाईन किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे पाठवली जाईल.

Direct link to check Maharashtra HSC Result 2025

पात्रता परीक्षांसाठीच्या विद्यार्थ्यांना पडताळणीत प्राधान्य

“ज्या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षा, प्रोफेशनल अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा, पात्रता प्रवेश परीक्षा, जेईई, नीट या परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, छायाप्रत व पुनर्मूल्यांकन तातडीने करून देण्याच्या सूचना सर्व विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सदर परीक्षेच्या प्रवेश पत्राची प्रत विशेष शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी लागेल”, असंही महाराष्ट्र बोर्डानं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.