राजापूर – राजापुर तालुक्यात सापडलेल्या कातळ शिल्पांनी जगाच्या नकाशावर एक वेगळी छाप उमटविली आहे. तालुक्यातील देवाचेगोठणे येथील वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा मिळण्यासाठी शासन स्तरावरुन हालचालींना सुरुवात झाली आहे. याविषयीची राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अधिसूचना जारी केली आहे. यामुळे येथील कातळ शिल्पांना लवकरच राजाश्रय मिळणार आहे.

राजापूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये कातळशिल्प सापडली आहेत. कोकणातील मानवी उत्क्रांतीचा उलगडा करणारा हजारो वर्षापूर्वीचा ठेवा आकर्षणाचा विषय ठरला आहे. देवाचेगोठणेतील येथील वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा मिळण्याच्यादृष्टीने राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यावर येत्या दोन महिन्यांमध्ये हरकती आणि सचूना मागविण्यात आल्या आहेत. ही प्रशासकीय प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर, देवाचेगोठणे रावणाचा माळ येथील जांभा दगडातील चुंबकीय विस्थापन दर्शविणारी जगातील एकमेव जागा म्हणून नावलौकीक असलेल्या या कातळशिल्पाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा मिळणार आहे.

हजारो वर्षापूर्वीचा ठेवा असलेली कातळशिल्प रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये सापडली आहेत आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील गोवळ, साखरकोंबे, बारसू, सोलगाव, देवाचेगोठणे, उपळे, भालावली, सोगमवाडी, देवीहसोळ, विखारेगोठणे, रूंढे आदी ठिकाणी सापडलेल्या कातळशिल्पांमध्ये दोनशेहून अधिक कातळशिल्पांचा समावेश आहे. निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड, धनजंय मराठे, डॉ सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी संशोधन करून शोधलेल्या या कातळशिल्पांमध्ये विविध प्राणी, भौमेतिक रचना, मनुष्याकृती, चित्रकृती व दिशादर्शक खुणा आदींचा समावेश आहे. देवाचेगोठणे रावणाचा माळ येथील वैशिष्ट्यपूर्ण एक कातळशिल्प आहे. देवाचेगोठणे येथील मुकुंद वासुदेव आपटे व गोविंद शंकर आपटे यांच्या जमीन मिळकतीत आढळून आलेल्या या कातळशिल्पामध्ये एक मनुष्यकृती दाखविण्यात आली आहे.

प्रागौतिहासिक काळातील मानवाने निर्माण केलेल्या या कातळशिल्पाला चुंबकीय विस्थापन क्षेत्राच्या अस्तित्वामुळे या कातळशिल्पाला विशेष महत्व आहे. या कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा मिळण्याच्यादृष्टीने राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये संरक्षित करावयाच्या जागेचे स्मारकासह एकूण क्षेत्रफळ ८० चौरस मीटर क्षेत्र असून त्यावर येत्या दोन महिन्यांमध्ये हरकती नोंदवायच्या असल्याचे अधिसूचनेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या कातळशिल्पाला राज्य संरक्षित म्हणून दर्जा मिळाल्यास या कातळशिल्पाचे संरक्षण होताना जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांसाठी अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.