समृद्धी महामार्गाच्या उद्या (रविवार) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं उद्घाटन होणार असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उद्घाटन कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, उद्घाटनाच्या एक दिवस आधी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, सीमाप्रश्न सोडवता येत नसेल तर महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा काही अधिकार नाही, असं म्हणत टीका केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतंय की सीमाप्रश्न कालच तयार झाला आहे आणि आमचं सरकार हे जे सहा महिन्यांपूर्वी आलं, त्यामुळेच सीमीप्रश्न तयार झाला आहे. अशाप्रकारचं वक्तव्यं हे केलं जात आहे. माझा प्रश्न असा आहे की, आपणही होता अडीच वर्षे काय केलं सीमाप्रश्नाचं?, कुठली केस आपण लावून घेतली? त्या संदर्भात एकतरी प्रगती केली का?”

हेही वाचा – चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

याशिवाय, “हा विषय वर्षानुवर्षे चालला आहे, गंभीर आहे. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अशाप्रकारच्या प्रश्नावर कधी राजकारण झालं नाही. आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो, तिकडे कर्नाटकामध्ये आमच्या मराठी बांधवांवर अन्याय झाला, लाठीचार्ज झाला. सगळे एकत्रितपणे विधानभवनात पक्षाचा विचार न करता एकत्रित येत होतो. एकमेकांवर बोटं दाखवत नव्हतो. मला असं वाटतं सीमा प्रश्नाच्या गंभीरतेपेक्षा, त्यावर किती जास्त राजकारण करता येईल हा प्रयत्न सुरू आहे.” असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

पाहा व्हिडीओ –

उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत? –

“समृद्धी महामार्ग झालाच पाहिजे. पण एका मोठ्या रस्त्याचं उद्घाटन करत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकचा रस्ता कर्नाटक जर महाराष्ट्रासाठी बंद करत असेल, तर पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांना काय बोलणार आहात? आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहात? हे आधी बोला आणि मग शिवसेनाप्रमुखांचं नाव असलेल्या महामार्गाचं उद्घाटन करा. कारण स्वत: शिवसेनाप्रमुख सीमाप्रश्नासाठी तीन महिने तुरुंगात राहिले होते. शिवसेनेची भूमिका बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही आहे. आज बाळासाहेबांची शिवसेना म्हणवणाऱ्या लोकांची भूमिका काय आहे हेही स्पष्ट झालं पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra karnataka border dispute you were there for two and a half years what did you do about the border issue devendra fadnavis question to uddhav thackeray msr
First published on: 10-12-2022 at 21:58 IST