आजी-आजोबांचं त्यांच्या नातवंडांशी असलेल्या नात्याचीड तुलना कोणत्याही नात्याशी होऊ शकत नाही. आजी-आजोबांच्या नात्याचं असंच एक सुंदर उदाहरण समोर आलं आहे. जामनेर येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्याला गिरीष महाजन हे उपस्थित होते. परंतु यावेळी एक अशी व्यक्ती त्या ठिकाणी होती ज्यांनी सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. ती व्यक्ती म्हणजे गिरीष महाजन यांचा नातू. चक्क गिरीष महाजन यांच्यासोबत त्यांचा नातूही त्या ठिकाणी हजर झाला होता.
अयांश चौधरी असं त्याचं नाव असून तो गिरीष महाजन यांच्या कन्या प्रिया महाजन-चौधरी यांचा मुलगा. शुक्रवारी रात्री जामनेरमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिरीष महाजन यांच्यासोबत अयांशही त्या ठिकाणी पोहोचला होता. गिरीष महाजन हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अयांश मात्र गिरीश महाजन यांच्याबरोबर मंचावर नाही तर कार्यकर्त्यांमध्ये खाली बसून त्यांचं भाषण ऐकत होता.
कार्यकर्ते आणि गिरीष महाजन यांचं नातं वेगळं आहे. परंतु आपल्या नातवालाही कार्यकर्तेहे आपलाच परिवार आहेत, याची जाणीव व्हावी म्हणून त्यांनीही त्याला खाली बसू दिलं, अशी प्रतिक्रिया आता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, गिरीष महाजन आणि त्यांच्या नातवाचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.