Marathi News Today, 10 October 2023: राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातली सुनावणी निवडणूक आयोगासमोर चालू असून त्यावरून पक्षाच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी आता शरद पवारांच्या सभांवर त्याच ठिकाणी उत्तरसभा घ्यायच्या नाहीत, असा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दोन गटांमध्ये नेमकं काय घडतंय, याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर शिवाजी पार्कवर नेमका शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार की ठाकरे गटाचा? यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत.
Mumbai Maharashtra Live News Today: शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा मुद्दा तापला!
अंबरनाथः शहराच्या वेशीवर असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून जाणाऱ्या जलवाहिन्यांवर बिबट्या बसला असल्याचे छायाचित्र प्रसारीत झाल्याने एकच खळबळ उडाली.
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अमृतानंजन ते खंडाळा बोगद्यादरम्यान ओव्हरगेड गॅन्ट्री बसविण्याचे काम मंगळवारी दुपारी पूर्ण झाले. द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंगळवारी दुपारी १२ ते २ दरम्यान बंद करण्यात आली होती.
पुणे : ससून रुग्णालयातून कैद्याने पलायन केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी धंगेकर यांनी केली. त्यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतापलेल्या धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली.
पिंपरी : मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे. माझ्या नादी लागू नका, मला हलक्यात घेऊ नका, पाठीमागून वार करणे सोडा, पुढे येऊन वार करा असे आव्हान देत चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके यांना सर्वांसमोर खडेबोल सुनावले. जगताप यांचा रौद्रावतार पाहून सर्वजण अवाक झाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनापेक्षा ऑनलाईन कामाच्या जोखडासह अन्य अशैक्षणिक आणि अध्यापनावर दुष्परिणाम करणाऱ्या कामांनी बेजार केले आहे. राज्यात हजारो शाळेत आवश्यक संख्येने शिक्षक उपलब्ध नाहीत.
नवरात्र, धम्मचक्र प्रवर्तन दिनी अधिकृत वीज जोडणी न घेणाऱ्या मंडळांवर महावितरण कारवाई करणार आहे. या कार्यक्रमात वीज अपघात टाळण्यासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
संघटन व पक्षविरोधी कारवाया आणि संघटनेच्या ध्येयधोरणा विरुध्द कार्य करणे यासह इतर अनेक तक्रारींची वरिष्ठांनी दखल घेवून स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष अर्जुन खरात यांची संभाजी ब्रिगेड मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
आम्ही दोनच सभा उत्तरसभा म्हणून घेतल्या. बीड आणि कोल्हापूर. येवल्याला आमची काही सभा झाली नाही. युवा संघर्ष यात्रा म्हणजे कुणाशी संघर्ष, कसला संघर्ष ते आता कळेल. पुण्याला सभा घेण्याचा आमचा काही मानस नाही. रविवारी पुणेकर अजित पवारांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आले. हे भाग्य अजित पवारांचंच असेल. निवडणूक आयोगासमोरची सुनावणी आणि आमच्या उत्तरसभांचा कसलाही संबंध नाही. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांचा राज्यव्यापी दौरा सुरू होईल. त्याचं नियोजन मी करतोय. दसऱ्यानंतर हा राज्यव्यापी दौरा सुरू होईल - सुनील तटकरे
नागझिरा अभयारण्यात दोन चितळाची शिकार करून त्यांचे मांस शिजवून खाणाऱ्या आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर करण्यास वन अधिकारी असक्षम ठरल्याने अखेर ५ आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
अजित पवार म्हणतात, “टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे असं मी मानतो. सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतो. पण फक्त…”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये सामील होऊन, आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं आपल्या सर्वांशी साधलेला हा पत्रसंवाद - अजित पवार
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1711635589320335793
उरण : नेरुळ – उरण रेल्वेच्या नोकर भरतीत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या सोईसाठी सीएनजीवर धावणाऱ्या १०० गाड्या घेण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. त्याचबरोबर २०० गाड्या भाडेकराराने घेण्यात येणार असून, त्याबाबतची प्रक्रिया पीएमपी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने गाड्या येणार असल्याने प्रवाशांनाही विविध मार्गांवर गाड्या उपलब्ध होणार आहेत.
शहरातील ४० टक्के पथदिवे बंद असून नवरात्री उत्सवापूर्वी विविध भागात पथदिवे लावावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना ठाकरे गटातर्फे निवेदन देण्यात आले आहे.
पुणे : मेट्रोच्या कामामुळे पीएमपीचे तीन मार्ग खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर एका मार्गावरील खेपांची संख्या वाढविण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या बुधवारपासून (११ ऑक्टोबर) होणार आहे.
भाजपच्या ओबीसी यात्रेदरम्यान खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर तिखट शब्दात टीका केल्यानंतर दोघांमध्ये वाक् युद्ध पेटले आहे. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमतींना ‘ठाकूर’ पदवी मिळाली, असे वक्तव्य डॉ. बोंडेंनी केले होते.
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांचा वाहनतळ रेल्वे प्रशासनाने सूचना केल्यानंतर हटविण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाने आदेश देऊनही रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आपला वाहनतळ तसाच सुरू ठेवला आहे. यामुळे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी आदेश देऊनही रेल्वे सुरक्षा दल जुमानत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँड हटवण्यावरून गोंधळ. मंदिराच्या चारही दरवाज्यांबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांच्या चपला ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले स्टँड अनधिकृत असल्याचं सांगत पालिकेकडून हे स्टँड काढण्यात येत आहेत. मनसेनं यासंदर्भात स्टँडधारकांची बाजू घेतली आहे. प्रकरण कोर्टात असताना निकाल येण्याआधीच कारवाई केली जात असल्याची भूमिका स्टँड धारकांनी घेतली आहे.
मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार या लोकप्रतिनिधींकडून होणारी उद्घटन, भूमिपुजन व लोकार्पण आता भाजपचे पदाधिकारी करायला लागले आहेत. घुग्घूस येथे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कामाशी संबंध नसतानाही गुपचूप भूमिपूजन, उदघाटन आटोपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
टोल आकारणीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. नागपूर जिल्ह्यात खापा येथे टोल वसुलीच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी आंदोलन रद्द करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो, की शासनाच्या दबावाला बळी पडून प्रशासनाच्या अधिकारांचा गैरवापर करू नका. आमच्या कुटुंबीयांवर विनाकारण कारवाई करणार असाल, तर तुम्ही तुमच्या मुला-बाळांचा विचार करा, असा थेट इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे दोन तासांसाठी बंद असणार आहे. ओव्हरहेड वायरिंगचं काम करण्यासाठी हा ब्लॉक करण्यात येत आहे. अमृतांजन पुलाच्या अलीकडेच हे काम केलं जात आहे. दुपारी १२ ते २ या दोन तासांसाठी ब्लॉक घेतला जात आहे. मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. हलक्या वाहनांची वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे. तर अवजड वाहनांची वाहतूक खालापूर टोलनाक्याच्या अलिकडेच थांबवण्यात आली आहे.
पुणे : बनावट शस्त्र परवाना बाळगून सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या आठजणांना वानवडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून जम्मू काश्मीर येथून बनावट शस्त्र परवाना मिळवल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, १२ बोअरची बंदूक, ५६ काडतुसे, तीन बनावट शस्त्र परवाने असा सहा लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्या राज्यात ठिकठिकाणी सभा होत असतानाच पुण्यातही विजयादशमीच्या निमित्ताने सभा होण्याची शक्यता आहे. कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला दसऱ्यापासून सुरुवात होणार असून, या निमित्ताने पवार यांची सभा होणार आहे. त्याबाबतचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाले आहे.
पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची तस्करी करणारा कैदी ललित पाटील फरार झाला होता. त्यानंतर ससून रुग्णालयात अनेक कैदी महिनोमहिने उपचाराच्या नावाखाली तिथे ठाण मांडून बसल्याचे समोर आले होते.
पनवेल : २५ मेट्रीक टन हायड्रोजन पेरॉक्साइड ड्रमने भरलेला टँकर मुंब्रा पनवेल महामार्गावरील नावडे फाटा येथे मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता कलंडला. टँकर कलंडल्यानंतर त्यातून धूर येऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली. नावडे फाटा येथे महामार्गालगत शाळा असल्याने पोलिसांनी तातडीने नावडे फाटा ते रोडपाली जंक्शन या दरम्यानची रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी १५ हजारांचे आर्थिक सहाय्य मिळेल.
कापूस उत्पादक चळवळीचे प्रणेते डॉ. वा.रा. कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा समारोप व सहकार महामेळावा माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत १२ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचारी भरण्यासाठी नवीन शासन निर्णयानुसार तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.
कोणत्याही दबावतंत्राला मी बळी पडणार नाही. अध्यक्षांबद्दल वैयक्तिक टीका करून जर कुणाला वटत असेल की आपण अध्यक्षांच्या निर्णयावर दबाव टाकू शकू, तर ती त्यांची चूक आहे. मी कोणत्याही दबावाखाली काम करत नाही. या टीकांना काय अर्थ आहे? ज्या लोकांना कायदा, नियम माहिती नाही असे लोक हेतुपुरस्सर टीका करतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. - राहुल नार्वेकर
राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू
Mumbai Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!