Maharashtra Political News: मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामोर्चामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांनी भाषणे केली. यावेळी या नेत्यांनी मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबाबत सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. आज आपण राजकीय वर्तुळात करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या विधानांचा आढावा घेणार आहोत.
१) “…तर त्यांना दिसतील तिथे फोडून काढा”, मतदार याद्यांतील घोळाबाबत राज ठाकरे आक्रमक
राज ठाकरेंनी मतदार याद्यांमधील गोंधळावरून निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले. “आम्ही बोलतोय, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार बोलतायत की याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्षही बोलतोय, कम्युनिस्ट पक्षाचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत. एवढंच नाही, भाजपाचेही लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेंचे, अजित पवारांचेही लोक बोलतायत. अरे मग अडवलं कुणी? मग हे निवडणूक घेण्याची घाई का करत आहेत? साधी गोष्ट आहे. मतदारयाद्या साफ करा. त्यानंतर जेव्हा निवडणुका होतील, त्यात यश-अपयश सगळ्या गोष्टी मान्य असतील”, असं राज ठाकरे म्हणाले.
“जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याद्यांवर तुम्ही सगळे काम करा. चेहरे कळले पाहिजेत. जर त्यानंतर हे दुबार-तिबारवाले आले, तर तिथेच फोडून काढायचे. बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले.
२) “…अन्यथा हे सरकार सामान्य माणसाचं नाही”, पुण्यातील खूनानंतर रोहित पवारांची सरकारवर टीका
पुणे शहरातील नाना पेठेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा सप्टेंबर २०२४ मध्ये गणेश कोमकर याच्या टोळीतील गुंडांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केला होता. या वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणली होती. समीर काळे हा सध्या कारागृहात असून त्याचा भाऊ गणेश काळे याची पुण्यात भरदिवसा दोघांनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.
या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे नेते रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे. “पुण्यातील टोळीयुद्ध, दहशत आणि गुंडगिरी काही केल्या थांबायला तयार नाही. आज पुण्यात भरदिवसा सहा गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली. वरिष्ठांच्या बदावामुळे पोलिसांचे हात बांधले गेले असल्यानेच गुंडांची हिंमत वाढत असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. पुण्यासह राज्यात अन्यत्र घडणाऱ्या गुन्हेगारीची गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन याला तातडीने आळा घालावा आणि पोलिसांवरील राजकीय दबाव हटवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास फ्री हँड द्यावा अन्यथा हे सरकार सामान्य माणसाचं नाही तर गुंडांना पोसणारं आहे, याचीतरी कबुली द्यावी,” अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
३) मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर एक व्हावं लागेल – शरद पवार
मतदार याद्यांमधील घोळांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने आज मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चात शरद पवार देखील सहभागी झाले होते. यावेळी शरद पवारांनी भाषण करताना यामध्ये सरकार देखील याला समर्थन देत असल्याचा आरोप केला आहे. बनावट आधार कार्ड कसं तयार होतं याचं प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाल्याचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केली. बनावट आधारकार्ड तयार करुन मिळतात अशा त्या तक्रारी होत्या. कलेक्टर म्हणाले सिद्ध करा, पुरावे दिले गेले. मात्र ज्यांनी आरोप केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला समर्थन देतं आहे. आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. पण देशाची संसदीय लोकशाही ही टिकवायची असेल, मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आणि मला एक व्हावं लागेल. आज व्यासपीठावर असलेले नेते याच भावनेतून एकत्र आले आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगतो असे शरद पवार म्हणाले.
४) “मी आणि राज एकत्र आलोय ते…”,उद्धव ठाकरेंकडून युतीची घोषणा
मतचोरी आणि मतदार याद्याच्या घोळाच्या विरोधात मनसे आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत सत्याचा मोर्चाचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आणि राज दोघंही भाऊ एकत्र आलो आहोत. पण आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत. मराठी माणसांसाठी. हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत. आम्ही पुढे जात असताना तुम्ही साथ दिली पाहिजे. साथ देण्याची धमक असेल तर हाताची मूठ वळवून दाखवा. हा फोटो मतचोराच्या बादशाहकडे पाठवा. मतचोरी केली तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
५) “काळजी घे संजय काका…”; संजय राऊतांसाठी आदित्य ठाकरेंची खास पोस्ट
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याने ते पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहणार असल्याची माहिती त्यांनी एक्सवर पोस्ट करत दिली. सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांसह राजकीय वर्तुळातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राऊतांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील संजय राऊतांसाठी पोस्ट केली आहे. “काळजी घे संजय काका, प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस! आत्ताही तेच होईल, खात्री आहे!” असे आदित्य ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
