राज्यात सध्या आगमी महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकींच्या तोंडावर वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात विविध पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. तसेच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात झालेल्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.
राज ठाकरेंबाबत मनसेच्या माजी नेत्याचे महत्त्वाचे विधान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे. यातच राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) शिवसेना, काँग्रेस आणि मविआच्या नेत्यांसह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे हे काँग्रेसबरोबर गेले तर आपल्याला वाईट वाटेल असे म्हटले आहे.
ते म्हणाले, “शरद पवार किंवा उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाकडे गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. पण राज ठाकरे निवडणूक आयोगाकडे जात आहेत, याचे आश्चर्य वाटते. राज ठाकरे हे शरीराने महाविकास आघाडीकडे गेल्याचे दिसत आहे. मनाने त्यांचा ओढा कुठे आहे? हे सर्व जगाला माहीतच आहे. राज ठाकरे जर काँग्रेसबरोबर गेले तर मला नक्कीच वाईट वाटेल.”
‘त्यांनी आक्षेप घेतले तरी आम्ही आमचे काम करूच’
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदानात घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीने केला आहे. यादरम्यान मतचोरीचा आरोप व मतदार याद्यांमधील घोळांवरून निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीवर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
बावनकुळे म्हणाले “निवड्णूक आयोगाकडे जाणे हा विरोधी पक्षाचा अधिकारच आहे. आतापासूनच ते पराभूत मानसिकतेत गेले आहे. निवडणूक आयोगाकडे आम्हीही गेलो होतो. आक्षेप घेतले होते. आक्षेप घेतले तरी आम्हाला काही अडचण नाही आम्ही आमचे काम करू.” दरम्यान बावनकुळे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विरोधकांनी आक्षेप घेतले तरी काही होणार नाही असे त्यांना म्हणायचे आहे का? आम्ही आमचे काम करू म्हणजे नेमके काय ? असा सवाल केला जात आहे.
अनिल देशमुखांच्या मार्फत घायवळला पासपोर्ट दिला; राम शिंदेंचा रोहित पवारांवर गंभीर आरोप
खून, खंडणी, अपहरण अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांमध्ये अडकलेला आरोपी निलेश घायवळ बनावट कागपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेशात पळून गेला आहे. यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान भाजपाचे नेते राम शिंदे यांनी टीव्ही९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवारांवर आरोप केला आहे. “निलेश घायवळ यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, पासपोर्ट हा २०२० साली मिळालेला आहे. हा पासपोर्ट मिळण्यासाठी आमदार रोहित पवारांनी तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमूख यांच्या मार्फत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला,हे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं” असे राम शिंदे म्हणाले आहेत.
माझे आणि त्यांचे दूरदूरपर्यंत संबंध नाहीयेत. त्यामुळे मी गृहराज्य मंत्री असताना, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर मोक्का लावला आणि त्यातून सोडवण्यासाठी रोहित पवारांनी मदत केल्याचे मी नाही तर त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे, असेही राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले.
राम शिंदेंच्या आरोपांवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर
राम शिंदे यांनी केलेल्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. “प्रा. राम शिंदे सर, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं, एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. घायवळ देशाबाहेर आहे, आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात म्हणून कदाचित अहिल्यानगर SP साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते आपण नक्की बघा. पासपोर्ट २०२० साली मिळाला तेंव्हा केंद्रात भाजपचं सरकार होतं याचा विसर पडला का?” असे रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
“ज्यांना आपण राजरोसपणे विधीमंडळात घेऊन फिरलात, निवडणुकीत स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघात फिरवलंत, जे जाहीरपणे आपले चरणस्पर्श करतात, ज्यांची जाहिरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देतात त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? मग दूरदूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे, असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला?” असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.
“आता प्रकरण अंगलट आल्याने गोल गोल फिरवण्यापेक्षा घायवळने तुमचा प्रचार केला की नाही? तुमच्या बहुतांश सभांमध्ये घायवळने भाषणं केली की नाही? मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही? ते सांगा. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे पासपोर्ट कुणी दिला, बंदूक परवान्यासाठी कुणी शिफारस केली या सगळ्याची तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणा. सरकार तुमचं आहे, तर मग घाबरता कशाला?” असं आव्हान रोहित पवारांनी दिले आहे. सोबत त्यांनी काही फोटो आणि व्हिडीओ देखील दिले आहेत.
प्रमाणपत्र दिल्याशिवाय कुठलीही भरती होऊ नये – मनोज जरांगे
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावेत अशी मागणी आज मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ते म्हणाले की, “मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, जीआर कोणी रद्द करू शकत नाही. तुम्ही जीआर रद्द करून दाखवा मग मी सांगतो. फडणवीस साहेब अजूनही संधी गेलेली नाही. गोरगरीब मराठ्यांशी बेईमानी होऊ नये ही आमची इच्छा आहे. प्रमाणपत्र लवकर वितरित करा,” असे मनोज जरांगे म्हणाले.
“सरकारशी बोलणं झालं आहे का, राधाकृष्ण विखे पाटील सरकारच्या वतीने अंतरवलीला आले होते. त्यांनीच सांगितलं की जीआरप्रमाणे होणार, फक्त शेतकरी थोडा संकटात आहे म्हणून वेळ द्या, त्यामुळे वेळ दिला होता. आमचं म्हणणं आहे की दिवाळीपर्यंत प्रमाणपत्र वितरित करा. तुम्हाला दिवाळीच्या नंतरही आणखी १०-१५ दिवस वेळ लागत असेल, तर मराठवाड्यातील सगळ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कुठलीही भरती होऊ नये,” असे मनोज जरांगे म्हणाले.