Maharashtra Politics Todays Top 5 Stories: राज्यात येत्या काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपामध्ये पुण्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याचबरोबर फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून सरकारवर विरोधक टीका करत आहेत. याचबरोबर राज्यातील दिवसभरातील चर्चेतील पाच राजकीय वक्तव्यांचा आढावा घेऊया.

लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज: अंबादास दानवे

साताऱ्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेवरून शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी सरकारला जाब विचारत आठ प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात, अशी टीकाही दानवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

“आज लाडकी बहीण पेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे. फडणवीसजी तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात. तुम्ही राजीनामा द्या”, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

“आता थांबले पाहिजे”, मंत्री संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत

शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आज एक मोठे विधान केले आहे. “आता थांबले पाहिजे”, असे म्हणत थेट राजकीय निवृत्तीचे संकेत संजय शिरसाट यांनी दिले आहेत.

“मी अल्पसंतुष्ट असा व्यक्ती आहे. हे पाहिजे किंवा ते पाहिजे अशी मला कधीही इच्छा नव्हती आणि नाही. १० वर्ष मी नगरसेवक होतो, २० वर्ष मी आमदार आहे. ज्याचे कधी स्वप्न पाहिले नाही ती सर्व पदे आपण भोगली आहेत. अखेर काही काळानंतर माणसाचे वय थांबायला भाग पाडते. आपण तिथपर्यंत विचार करायचा नाही. कधीतरी मध्येच थांबायचे का? हा प्रश्न माझ्या मनामध्ये काल आला”, असे मंत्री संजय शिरसाट यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटले आहे.

रवींद्र धंगेकरांना माझ्याकडून निरोप: एकनाथ शिंदे

पुणे शहरातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपाचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

माजी आमदार रवींद्र धंगेकर केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. याबद्दल विचारले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “रविंद्र धंगेकरांना माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो होतो तेव्हाही भाष्य केले होते, आजही सांगतो की प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये बेबनाव होईल असे कृत्य, वक्तव्य करू नये.”

“मी दिल्लीत आलो तर चर्चा होतात”, एकनाथ शिंदे

आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे या भेटीचे कारण काय? याबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींची भेट का घेतली? या भेटीत काय चर्चा झाली? याविषयची सविस्तर माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

“मी दिल्लीत आलो तरी चर्चा होतात आणि मी शेतात गेलो तरी चर्चा होतात. चर्चा करणारे चर्चा करतात, त्यांच्या चर्चा सुरू असतात, पण मी माझं काम करत असतो. पंतप्रधान मोदी हे देशासाठी जे काही काम करतात, त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे”, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

नाशिक जिल्ह्यात चार मंत्री, पण एकालाही दयामाया नाही: आमदार हिरामण खोसकर

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवरून स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरोज अहिरे आणि हिरामण खोसकर या आमदारांनी एनएमआरडीएची कारवाई चुकीची ठरवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाशिक जिल्ह्यातील चारही मंत्र्यांंवर ताशेरे ओढले आहेत.

आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्ह्यात आदिवासी समाजाचा एक, मराठा समाजाचे दोन, माळी समाजाचा एक असे एकूण चार मंत्री असल्याचे सांगितले. सर्व आपले लोक आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर लोक रस्त्यावर उतरले असताना मंत्र्यांना दयामाया आली नाही. साधू-महंतांना जे कळते ते या मंत्र्यांना कळत नाही. असा टोला हाणत त्यांनी स्थानिक मंत्र्यांवर रोष व्यक्त केला.