शिवसेनेविरोधात बंड पुकारणारे नेते एकनाथ शिंदे सध्या ट्विटरच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या भावना मांडत आहे. शिवसेनेमधील नेते, आमदारांवर कशाप्रकारे महाविकास आघाडीत अन्याय झाला हे सांगण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यामधील पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत शंभुराजे देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करत आरोप केला आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड आणि राज्यातील स्थितीचीप्रत्येक अपडेट

“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पाच विभागांचा राज्यमंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये मी काम करत आहे. पाच खाती राज्यमंत्री म्हणून आमच्याकडे आहेत. खाती आमच्याकडे दिली पण राज्यमंत्र्याला किती अधिकार होते हेदेखील निमित्ताने माहिती होणं गरजेचं आहे. सामान्य शिवसैनिकांना, आमदारांना राज्यमंत्र्यांकडे गेलं की लगेच काम झालं असं वाटतं. पण राज्यमंत्र्यांकडे केवळ आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिकांची आलेली कामं यावर शिफारस करुन कॅबिनेट मंत्र्यांकडे देणं इतकंच काम होतं. विधानसभेच्या अधिवेशन काळात सभागृहात सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि कामकाज हाताळणं इतक्यापुरतंच नामधारी राज्यमंत्री म्हणून आम्ही करत होतो,” असं शंभुराजेंनी म्हटलं आहे.

“माझ्यासोबत अनेक राज्यमंत्री सहकाऱ्यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढवून दिले पाहिजेत अशी मागणी केली. पण अडीच वर्षात अधिकार मिळाले नाहीत,” असं त्यांनी सांगितलं.

“राज्यमंत्री असूनदेखील आम्हाला आमच्या मतदारसंघात निधी मिळत नाही. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देतात. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही,” असा दावा शंभुराजे देसाईंनी केला आहे.

“नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड येथील समाधीस्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील कार्यक्रमात केली होती. अर्थ व वित्त राज्य मंत्री नात्याने याची मी विधानपरिषदेत घोषणा केली. यासाठी ५ कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थ राज्यमंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले नाहीत,” असं शंभुराजेंनी सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज करा. आमची भुमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्व शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी माझी विनंती आहे,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.