राज्याच्या राजकारणात शाब्दिक चकमकी सुरूच आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नवा राजकीय उभा राहिला आहे. पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका होत असून, आमदार रोहित पवार यांनीही पाटलांना टोला लगावला आहे.

“राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना केलं होतं. त्यांनी केलेल्या विधानाला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देताना टोला लगावला आहे.

आणखी वाचा- शरद पवारांना छोटे नेते म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी फटकारलं; म्हणाले…

रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. “सचिनकडून एखादा बॉल सुटला, तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन tvवर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा… “अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही…” पवार साहेबांबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं,” अशा शेलक्या शब्दात रोहित पवारांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिलं.

आणखी वाचा- सांगितलं होतं पवारांचा नाद करू नका, पण सुधारणार नाहीत; धनंजय मुंडेंनी भाजपाला दिली आठवण

“मला चंपा म्हणतात ते चालतं का?”

पवारांविषयी केलेल्या विधानावर नंतर पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता, मला चंपा म्हणतात ते चालतं का? मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून याबाबत भीती निर्माण केली जाते आहे. कालच्या ओबीसी मेळाव्यात यासंदर्भात बोलताना मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. पण तुम्ही मोदींबद्दल आणि माझ्याबद्दल बोलतात ते चालतं का? मी उद्धव ठाकरेंबद्दलही बोलतो. त्याबद्दल कधी शिवसेना बोलली नाही, राजकारणात असं बोललं जातं. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलू दे!” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.