राज्यभरातील सव्वालाख शिक्षकांचा जीव टांगणीला

ग्रामविकास विभागाच्या नव्या धोरणाने बदल्यांची सर्व प्रक्रिया केंद्रीभूत करण्यात आली आहे.

( प्रतिकात्मक छायाचित्र )

बदल्यांचा पहिला टप्पाही अर्धवटच

शिक्षक व अधिकारी पातळीवर अनाकलनीय ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणामुळे राज्यभरातील सव्वालाख शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे, शिवाय ऑनलाइन व्यवस्थेमुळे कुमारी शिक्षिकांना विधवा दाखविण्याचे गंभीर प्रकार घडू लागले आहेत. ग्रामविकास मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेत कार्यरत राज्यातील पावणे दोन लाख शिक्षकांपैकी सव्वालाख शिक्षकांना बदलीच्या नव्या धोरणाला सामोरे जावे लागत आहे. शासन निर्णयानुसार ३१ मेपर्यंत बदलीचे सर्व सोपस्कार पूर्ण होणे आवश्यक आहेत. मात्र, जुलै उंबरठय़ावर आला असतानाच बदल्यांचा पहिला टप्पाही अर्धवटच आहे. परिणामी बदल्यांचा घोळ दिवाळीपर्यंत चालण्याची भीती शिक्षक नेते व्यक्त करतात.

ग्रामविकास विभागाच्या नव्या धोरणाने बदल्यांची सर्व प्रक्रिया केंद्रीभूत करण्यात आली आहे. सरल संगणीकृत प्रणालीने होणाऱ्या या बदल्यांना टक्केवारीचे बंधन नाही. तालुका व जिल्हास्तर बदली प्रणाली रद्द करण्यात आली असून सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे नोकरी झालेला प्रत्येक शिक्षक बदलीस पात्र ठरविण्यात आला. बदल्यांचे पाच टप्पे करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सर्व तालुक्यात समान शिक्षक संख्या, दुसऱ्या टप्प्यात वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक, विधवा, अपंग अशा विशेष प्रवर्गातील शिक्षकांना पसंतीप्रमाणे नियुक्ती, तिसऱ्या टप्प्यात पती-पत्नी दोघेही नोकरीस असल्यास ३० कि.मी.च्या आत बदली, चौथ्या टप्प्यात अवघड क्षेत्रात सेवा देणाऱ्यांना पसंतीनुसार नियुक्ती व पाचव्या टप्प्यात सेवेस १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विनंतीने मिळणाऱ्या बदल्या असे धोरण आहे.

अद्याप पहिलाच टप्पा पूर्ण झाला नसल्याची स्थिती आहे. बदल्यांचे पोर्टल १७ जूनला सुरू झाले. विशेष संवर्गातील शिक्षकांना २१ जूनपर्यंत अर्ज भरणे आवश्यक होते. मात्र, पोर्टल बंद किंवा संथगतीने कार्यरत राहल्याने अर्ज भरण्याचे काम अद्याप झालेले नाही. परिणामी ३० जूनची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. गटशिक्षणाधिकारी पातळीवर हे कार्य चालले आहे. पण कामाचा आवाका मोठा असल्याने कार्यालयातील संबंधित लिपिकांनी ज्येष्ठ शिक्षकांना संकेतस्थळाचा सांकेतांक देत जबाबदारी झटकली. यामुळे घोळात भरच पडत गेली.

‘धोरण अनाकलनीय’

या संदर्भात मंत्री पातळीवर चर्चेत सहभागी झालेले प्राथमिक शिक्षक समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय कोंबे म्हणाले, धोरणात बदल्यांची टक्केवारी नसल्याने राज्यातील सव्वालाख प्राथमिक शिक्षकांवर एकाचवेळी बदलीची टांगती तलवार आहे. धोरणाचा नेमका व वस्तुनिष्ठ अर्थ कुणीही सांगू शकत नाही.  ऑनलाइन बदल्यांची व्यवस्था सक्षमतेने कार्यरत न झाल्याने राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा प्रकार प्रथमच गमतीदार ठरला आहे. हे धोरण अनाकलनीय आहेत. वेळीच सुधारणा न झाल्यास प्राथमिक पातळीवर शिक्षणाचा खेळखंडोबा अपरिहार्य ठरेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra primary teachers badly suffer with government transfer policy

ताज्या बातम्या