राज्यात करोना संसर्गाची तिसरी लाट आल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शिवाय, ओमायक्रॉन बाधित रूग्ण संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर आता कराज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये तर पहिली ते आठवीपर्यंतच्या ऑफलाईन शाळा देखील ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

वाय, रूग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास पुन्हा एकदा लॉकडाउन लावाण्याची वेळ येते की काय अशी देखील भीती आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात १८ हजार ४६६ नवीन करोनाबाधित आढळले असून, ओमायक्रॉनच्या ७५ रूग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय २० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे.

तसेच, आज राज्यात ४ हजार ५५८ रुग्ण करोनामुक्त देखील झाले आहेत. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१८,९१६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८६ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण ६६,३०८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,३०,४९४ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १४१५७३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९५,०९,२६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,३०,४९४ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९८,३९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १११० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –

आज राज्यात ७५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत.

रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

· मुंबई – ४०
· ठाणे मनपा- ९
· पुणे मनपा – ८
· पनवेल- ५
· नागपूर, आणि कोल्हापूर – प्रत्येकी ३
· पिंपरी चिंचवड -२
· भिवंडी निजामपूर मनपा , उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई – प्रत्येकी १

आजपर्यंत राज्यात एकूण ६५३ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.