महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरुवात होणार आहे.

नोव्हेंबर महिना संपत आला तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेर बुधवारी मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची नियमित, द्विलक्ष्यी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल.

दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे. त्यापूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. सोशल मीडियावरील वेळापत्रकाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूरसह राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.