गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर या दोन मतदार संघांमधील मतदारांच्या यादीत असल्याचा आणि त्यांनी मतदानाचा हक्कही बजावल्याचा आरोप करण्यात आला असून डॉ. पाटील यांनी मात्र नावांमधील बदल ही त्रुटी असू शकते, असे सांगून चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

डॉ. पाटील यांचे घुंगशी हे मूळ गाव मूर्तिजापूर तालुक्यात आहे. मूर्तिजापूर आणि अकोला पूर्व या दोन मतदारसंघांच्या मतदार याद्यांमध्ये त्यांचे नाव बदलले आहे. ‘रणजित पाटील’, ‘रंजित पाटील’, ‘आप्पासाहेब पवित्रकार’ या नावांनी त्यांचे मतदार ओळखपत्रही बनले आहे, असा आरोप घुंगशी येथील विक्रांत काटे यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी हे आरोप केले असले, तरी डॉ. पाटील यांनी मात्र ते फेटाळले आहेत. मतदार याद्यांमध्ये नावांचा बदल ही त्रुटी असू शकते. मानवी चुकीचा तो प्रकार असावा, पण आपण कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
डॉ. पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी, बंधू आणि कुटुंबातील इतर सदस्यांचीही नावे अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर येथील मतदार याद्यांमध्ये आहेत. वेगवेगळ्या नावांनी त्यांची ओळखपत्रे बनवली गेली आहेत आणि त्यांनी मतदानही केले आहे, असा काटे यांचा दावा आहे. आपण या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचेही काटे यांचे म्हणणे आहे.