Maharashtra Political News: राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचबरोबर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मंत्री बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कर्जे फेडायची सवय लावावी, असे विधान केले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात चर्चेत असलेल्या पाच राजकीय विधानांचा आढावा घेऊया.

“धर्माच्या नावावर लोकांना आंधळे केले की…”, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाबाबत आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच सत्ताधारी पक्षाला चिमटेही काढले आहेत.

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मी दोन दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट पाहिला. समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असे नाही. पण खरा समकालीन किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाला पर्याय नाही.”

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे “विकास’ अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यात बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केले आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळे केले की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवे तसे वापरून फेकून द्यायला हे मोकळे.”

“गृहविभाग भाजपाच्या कार्यालयातून चालतो का?” ‘सत्याचा मोर्चा’वर गुन्हा, रोहित पवार संतापले

राज्यातील मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने मुंबईत शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि मनसे सहभागी झाले होते.

या मोर्चानंतर आज मुंबई पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. “गृहविभाग भाजपाच्या कार्यालयातून चालतो का?”, असे म्हणत रोहित पवारांनी राज्याच्या गृहखात्यावर टीका केली आहे.

“निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध ‘सत्याचा मोर्चा’ काढला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ‘सत्याचा मोर्चा’ला परवानगी नव्हती म्हणून गुन्हा, तर मग भाजपाच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? परवानगी नसेल तर रवींद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही?”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

“मूक मोर्चाला परवानगी दिली असेल तर ‘सत्याच्या मोर्चा’ला परवानगी का दिली नाही? असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात. आधारकार्डचा डेमो दाखवला म्हणून माझ्यावर गुन्हा, काल सत्याचा मोर्चावर गुन्हा हे सर्व बघता गृहविभाग मंत्रालयातून नाही तर भाजपाच्या कार्यालयातून चालतो की काय? या शंकेचे समाधान होते”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून राज्य निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यात नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने अद्याप या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार दिलीप वळसे पाटील यांनी या निवडणुकीच्या तारखांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. आंबेगाव व शिरूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वळसे-पाटलांनी मोठी घोषणा केली आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “२०१७ साली महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर २०२२ मध्ये पुढच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. परंतु, राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात गेले. आता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकांबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की वाट्टेल त्या परिस्थितीत ३१ जानेवारीपूर्वी या निवडणुका पूर्ण करायच्या आहेत.”

“शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्या असे वाटते का?” अजित पवारांवर प्रकाश आंबेडकरांचा संताप

शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी “सारखेच फुकटात कसे मिळेल?” असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित केला होता. शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळेल? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, शेतकऱ्यांनी सारखेच कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये. तुम्ही देखील हातपाय हालवा. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला आहे की “राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे तुम्हाला वाटते का?”

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की “अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला? तुम्ही म्हणालात, ‘सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?’ पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील?”

‘ते थेट हॉटेलवरून उडी मारणार होते’; संजय शिरसाटांनी सांगितला गुवाहाटीतील किस्सा

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना बंडखोरीच्या वेळी गुवाहाटीत घडलेला एक किस्सा सांगत गौप्यस्फोट केला आहे. ‘तेव्हा आमदार बालाजी कल्याणकर यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता’, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच तेव्हा जर आमदारांची संख्या कमी पडली असती तर माझीही आमदारकी रद्द झाली असती, असेही संजय शिरसाटांनी म्हटले आहे.