दर दहा मिनिटांनी शेतकऱ्यांना हवामान अंदाज कळणार-मुख्यमंत्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामानाचा अचूक अंदाज नसल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यात प्रथमच स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दर दहा मिनिटांनी हवामानाची अचूक माहिती डिजीटल किऑक्सच्या माध्यमातून उपलब्ध होईल. त्यामुळे शेतीचे नियोजन करणे सुलभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

महावेध प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन नागपूर जिल्ह्य़तील डोंगरगाव येथे फडणवीस यांच्या हस्ते रविवारी पार पडले. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

हवामानाची अचूक माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नियोजन चुकते. दुबार पेरणीसह इतरही संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. नव्या यंत्रणेतून सर्व महसूल मंडळात २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यापैकी एक महिन्यात एक हजार केंद्र राज्यात सुरू होईल. यामुळे १२ बाय १२ किलोमीटर परिसरातील हवामानाची अचूक नोंद दर दहा मिनिटाला उपलब्ध होणार असून ५० लाख शेतकऱ्यांना एसएमएसच्या माध्यमातून ती पाठविली जाणार आहे.

यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी खात्याचे प्रधान सचिव विजयकुमार यांची भाषणे झाली.

काटोल येथे संत्रा, डाळींब प्रक्रिया केंद्र

काटोल येथे १२० एकर जागेवर संत्रा आणि डाळींब प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये जाणार होता. मात्र राज्याने उद्योग उभारणीसाठी प्रभावी धोरण स्वीकारल्याने काटोल येथे हा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यासाठी ११८ एकर जमीन केवळ सहा महिन्यात संपादित करण्यात आली आहे, असे फडणवीस म्हणाले.

तूर खरेदीचा पुनरुच्चार

जलयुक्त शिवार आणि इतर कृषी विकास कार्यक्रम राबविल्यामुळेच राज्यात २० लाख टन तुरीचे उत्पादन झाले. मागील १५ वर्षांत झाली नाही तेवढी तूर यंदा राज्य शासनाने खरेदी केली असून शेतकऱ्यांकडे असलेल्या शेवटचा दाणा सरकार खरेदी करेल, पण त्यांच्या नावाने व्यापाऱ्यांनी तूर विकली असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.

कोणती माहिती मिळणार

हवामान केंद्रासाठी स्कायमॅटची मदत घेण्यात आली आहे. त्यातून गावात किती पाऊस पडणार, कसा पडणार, केव्हा पडणार, तसेच कोणते पीक घेता येईल, सापेक्ष आद्र्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा यासह हवामानविषयक बदलाची सर्व माहिती शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे, असे कृषी खात्याच्या सचिवांनी सांगितले.

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtras first automatic weather center devendra fadnavis
First published on: 01-05-2017 at 02:44 IST