नागपूर : उमेदवाराच्या प्रचारासाठी पारशिवनीला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रेल्वेमुळे १५ मिनिटे अडकला. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस विभागाची मोठी तारांबळ उडाली. मात्र, रेल्वे फाटक उघडेपर्यंत मुख्यमंत्री कारमध्ये बसले होते. रामटेक मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोराडी खापरखेडा मार्गे पारशिवनीला जात होते. त्यांच्या ताफ्यात जवळपास ४० पेक्षा जास्त वाहने होती.
हेही वाचा : “सात वर्षांत एकही दंगल नाही, कारण आम्ही उलटे टांगतो”, गडकरींच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथांचे विधान
११.१५ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा खापरखेडा ब्रॉडगेज रेल्वे क्रॉसींगवर पोहचला. दरम्यान, छिंदवाडा पॅसेंजर रेल्वे जात असल्याने गेटमनने रेल्वेचे फाटक बंद केले आले. त्यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस ताफ्यात खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच मुख्यमंत्र्याच्या वाहनाला घेराव घातला. यादरम्यान, शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत हस्तांदोलन करण्याची हौस भागवून घेतली. अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यासह सेल्फी काढून आठवणी जपून ठेवल्या. १५ मिनिटानंतर रेल्वेचे फाटक उघडले आणि मुख्यमंत्री शिंदे पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.