राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहे. सांगलीतही महाविकास आघाडीच्यावतीने चंद्रकांत पाटील पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी भाजपच्या निषेधार्थ जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

हेही वाचा- चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मंत्री पाटील यांनी जबाबदारीने बोलणे अपेक्षित असताना वाचाळपणे बोलून समाजात शैक्षणिक क्रांती घडविणार्‍या समाज सुधारकाबाबत आक्षेपार्ह विधान करणे चुकीचे असून या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभोराज काटकर, राष्ट्रवादीचे विनायक हेगडे, काँग्रेसचे अमर निंबाळकर आदीसह कार्यकर्ते यांनी निषेध आंदोलन करत चंद्रकांत पाटलांवर कारवाई न करता भाजपचे नेतृत्व पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

हेही वाचा- “माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा, हिंमत असेल तर…”, शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाउराव पाटील यांनी शैक्षणिक प्रगती केल्यामुळेच बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. असे असताना भाजपाचे वाचाळवीर लोकोत्तर श्रध्दास्थानाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून महत्व कमी करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, बहुजन समाज जागा झाला असून याचे उत्तर निश्‍चितच देईल असे मत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी व्ययत केले.