Sanjay Raut on Mahesh Kothare: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलत असताना मी भाजपाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त असल्याचे म्हटले होते. तसेच मुंबईत भाजपाचा महापौर होईल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी महेश कोठारे यांच्यावर खोचक टीका केली.

तुमचे सिनेमे फक्त भाजपाचे लोक पाहतात का?

मुंबईत भाजपाचा महापौर होईल, असे विधान केल्याबद्दल संजय राऊत यांनी महेश कोठारेंवर टीका केली. ते म्हणाले, “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात, तुमचे सिनेमे फक्त भाजपाच्या लोकांनी पाहिलेले नाहीत.”

तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल

संजय राऊत पुढे गमतीत म्हणाले, तुम्ही असे काही बोलला तर तात्या विंचू तुम्हाला चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल.

नेमके काय म्हणाले महेश कोठारे?

मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, “भाजपा म्हणजे आपले घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही भक्त आहे.”

राजकारणावर बोलताना महेश कोठारे म्हणाले, “आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे. तसेच यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल…” महेश कोठारे यांच्या या विधानामुळे भाजपाने आतापासूनच मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर दावा करण्याची तयारी सुरु केल्याच्या चर्चा रंगल्या.

“मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो, तेव्हा मी म्हटले होते की, ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहे. आता या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल”, असेही महेश कोठारे आपल्या भाषणात म्हणाले.