जयकुमार गोरे यांचे माळशिरस, वेळापूर, पंढरपूरमध्ये जोरदार स्वागत

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात माफियागिरी आणि गुंडगिरी चालणार नाही. कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यास प्राधान्य राहील, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. सामान्य जनतेचे, युवकांचे प्रश्न सोडविण्याचे, त्यांची कामे मार्गी लावण्याची ताकद विठुरायाने द्यावी, असे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विठुरायाचे दर्शन घेतले, यावेळी आमदार समाधान अवताडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मंत्री गोरे यांचे माळशिरस, वेळापूर आणि पंढरपूर येथे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सामान्य कुटुंबातील एका युवकाला भाजपाने बळ दिले.

आमदार झालो, मंत्री झालो, सोलापूरचा पालकमंत्री झालो. त्यामुळे पक्षाचा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करण्याचे काम करणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. तर जिल्ह्यात वाळू माफिया, गुंडगिरी असे प्रकार सुरू आहेत, असे विचारले असता गोरे यांनी आक्रमक भूमिका जाहीर केली. यापुढे जिल्ह्यात कोणतेही माफिया राज चालणार नाही. कोणाची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी कठाेर पावले उचलण्याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना देणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामान्य जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावली जातील, असेही त्यांनी सांगितले. विठुरायाचे दर्शन घेऊन धन्य झालो. जनतेची सेवा करण्याची ताकद आणि सर्वसामान्यांचे प्रश्न, कामे मार्गी लावण्याची ताकद विठुराया मला दे, अशी हात जोडून विनंती केल्याचे गोरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रलंबित विषय तसेच विविध विकासकामे याबाबत आढावा घेऊन मार्गी लावणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी मंत्री गोरे यांनी केली, अशी माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.