Major General VV Bhide: १९७१ च्या भारत-पाकिस्तान अर्थात बांगलादेश युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मेजर जनरल व्ही. व्ही. भिडे यांचे पुण्यात १०२ व्या वर्षी निधन झाले. बांगलादेश युद्धात लेफ्टनंट जनरल जेएफआर जेकब हे ऑपरेशन्सचे नियोजन आणि देखरेख करत होते. त्यांनी तत्कालीन ब्रिगेडियर विजयकुमार विनायक भिडे यांची ईस्टर्न कामांडचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्त केले. पूर्व पाकिस्तानच्या खडतर अशा भौगोलिक परिस्थितीत सैन्यांची तात्काळ हालचाल करण्यासाठी सुविधा उभारण्याचे महत्त्वाचे काम भिडे यांनी केले होते.

पूर्व पाकिस्तानमध्ये अनेक नद्या आहेत. सैन्यांची वेगाने हालचाल करण्यासाठी डझनभर पूल तातडीने बांधणे आवश्यक होते. ब्रिगेडियर भिडे यांनी अशक्य वाटणारे हे काम वेळेत पूर्ण केले आणि सैन्याला पुढे जाता आले. भिडे यांच्या कामगिरीमुळे युद्धात विजय मिळवून देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली गेली. या कामगिरीसाठी त्यांना १९७२ साली विशिष्ट सेवा पदक (AVSM) देऊन गौरविण्यात आले.

शुक्रवारी बावधन येथील निवासस्थानी व्हीव्ही भिडे यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉम्बे सॅपर्समधील सर्वात वयस्कर योद्ध्याने अखेरचा श्वास घेतल्याची भावना व्यक्त होत आहे. लष्करातील अभियंत्यांच्या गटाला बॉम्बे सॅपर्स या नावाने ओळखले जाते. व्हीव्ही भिडे यांच्यामागे त्यांच्या तीन मुली आणि इतर कुटुंबिय आहेत.

मेजर जनरल भिडे एका प्रतिष्ठित कुटुंबातून आले होते. त्यांचे वडील भारतीय नागरी सेवेत अधिकारी होते. तर त्यांचे आजोबा प्रतिष्ठित वकील होते. भारतीय आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीताबद्दल मेजर जनरल भिडे अधिकारवाणीने बोलू शकत होते. तसेच कठीण परिस्थितीत ते मृदूभाषीही होते. त्यांच्या स्वभावामुळे भारतीय लष्करात ते सर्वांचे आवडते बनले होते.

मेजर जनरल भिडे यांची कन्या निर्मला भिडे यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना म्हटले की, वडिलांचा जन्म नागपूर येथे झाला होता. मात्र तीन महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे ते अमरावती येथे आजोबांकडे वाढले. १९३५ सालच्या डून स्कूलच्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी होते. १९४२ साली त्यांची तेव्हाच्या ब्रिटिश भारतीय लष्कराच्या रॉयल बॉम्बे सॅपर्समध्ये निवड झाली.

राम रक्षा ऐकत मृत्यूला कवटाळले

निवृत्तीनंतर मेजर जनरल भिडे यांनी आखाती देशात काही वर्ष काम केले. मात्र त्यानंतर त्यांनी पत्नीसह पुण्यात परतण्याचा निर्णय घेतला. वयाचे शतक पूर्ण केल्यानंतर काही महिन्यातच त्यांच्या पत्नीचे जुलै २०२२ मध्ये निधन झाले.

निर्मला भिडे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गुरूवारी रात्री ११ वाजता ते झोपायला गेले. पण त्यांचा ताप अचानक वाढू लागला. त्यानंतर ते झोपेतून उठून संस्कृत श्लोक म्हणून लागले. त्यांच्या विनंतीवरून मी स्पीकरवर राम रक्षा लावली. ती संपल्यावर ते म्हणाले, पुन्हा एकदा लाव. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.