“माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना साताऱ्याचा पुढचा खासदार करा.” भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकरांच्या या मागणीने खासदार उदयनराजेंच्या गोटात नाराजी पसरली असून, कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे सुरू केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,अनुप शहा आदी उपस्थित होते.

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे आता भाजपालाच नकोसे झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनीच फलटणमध्ये केलेल्या अशा प्रकाच्या विधानामुळे या चर्चेला अधिकच जोर आला आहे.

नगरपंचायत, पालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व फलटण तालुका संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी चंद्रकांत पाटील मंगळवारी फलटण येथे होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचंही भाषण झालं. यावेळी त्यांनी साताऱ्याच्या पुढच्या खासदाराबद्दल जाहीर वक्तव्य केले. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पुढच्या वेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. पावसकर यांचं हे विधान जिल्ह्यात महत्त्वाचं मानलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यांच्या राजकारणात मोठा दबदबा कायम आहे. लोकांशी थेट संपर्क ठेवण्याची त्यांची अनोखी पद्धत आणि कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा त्यांच्याकडे आहे. लोकसभेची निवडणूक पुन्हा मोठ्या ताकदीनिशी लढविण्याचे संकेतही वेळोवेळच्या कार्यशैलीतून दिलेले असताना, विक्रम पावसकर यांच्या केलेल्या विधानामुळं साताऱ्यात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपातील वरिष्ठ नेत्यांचा वाढत्या आग्रहामुळे उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार झालेले असतानासुद्धा त्या खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगून भाजपामध्ये आले. सहा महिन्यांत दुसऱ्यांदा निवडणुकीस सामोरे गेले आणि पराभूत झाले पुढे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे आता भाजपालाच नकोसे झाले असल्याची चर्चा साताऱ्यातील भाजपात सुरु आहे. त्याला भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत फलटणमध्ये जाहीरपणे नव्या वादाला तोंड फोडल्याचे दिसत आहे. जाहीर सभेत उदयनराजेंना डावलून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना साताऱ्यात पाठवून खासदार करावे. भारतीय जनता पार्टीचा पूर्ण ताकदीनिशी लढणारा खासदार आहे. त्यांना साताऱ्यातून आता खासदार करावे असे वक्तव्य पावसकर यांनी केल्यामुळे उदयनराजे समर्थकांमध्ये तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहेत.