Malegaon Bomb Blast Accused Acquitted: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि इतर सर्व आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. याशिवाय मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी यांचाही निर्दोष आरोपींमध्ये समावेश आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी रमजान महिन्यात मालेगावमधील भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०१ जण जखमी झाले होते.

एनआयए न्यायालयाच्या या निकालानंतर याबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात काय घडलं होतं, याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

एबीपी माझाशी बोलताना हा प्रत्यक्षदर्शी म्हणाला की, “९:३५ ला बॉम्बस्फोट झाला. ही घटना घडली त्यावेळी रमजानचा महिना होता. त्या दिवशी २८ वा रोजा होता. लोक नमाज पठण करून आल्यामुळे मोठी गर्दी झाली होती. त्या स्फोटात आमच्या दुकानाचं नुकसान झालं होतं. माझा भाऊ आणि दुकानातील कर्मचारी जखमी झाले होते.”

पीडितांना आर्थिक मदतीचे आदेश

न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी स्फोटातील सर्व सहा बळींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि सर्व जखमींना ५०,००० रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. एनआयए न्यायालयाने युएपीए शस्त्रास्त्र कायद्यातील आरोपींनाही निर्दोष मुक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नैतिक पुराव्यांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवू शकत नाही

एनआयए न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, “दहशतवादाला कोणताही धर्म नसतो कारण कोणताही धर्म हिंसाचाराचे समर्थन करू शकत नाही. न्यायालय केवळ भावना आणि नैतिक पुराव्यांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवू शकत नाही; यासाठी ठोस पुरावे असले पाहिजेत.”

न्यायालयाने म्हटले आहे की, “मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले परंतु त्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाही. जखमींची संख्या १०१ नाही तर ९५ होती आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती, असा निष्कर्ष न्यायालय काढला आहे.”