ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांपाठोपाठ रायगड जिल्ह्य़ात कुपोषणाचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला होता. या प्रश्नाची गंभिर दखल घेऊन जिल्हा नियोजन मंडळाने कुपोषण निवारणासाठी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. तर कुपोषणाचे प्रमाण अधिक असणाऱ्या भागात ग्राम बाल विकास केंद्र आणि बाल उपचार केंद्र पुन्हा कार्यान्वयित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र व्यापक उपाययोजनांनंतरही जिल्ह्य़ात कुपोषणाचे प्रमाण फारसे घटले नसल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्य़ातील १५ तालुक्यात ३ हजार २८३ अंगणवाडय़ा कार्यान्वयित आहेत. या अंगणवाडय़ांमधील ० ते ६ वयोगटातील १ लाख ४६ हजार ८८२ बालकांची महिला बाल कल्याण विभागामार्फत वजन तपासणी करण्यात आली. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या या तपासणीत ६ हजार २३२ मध्यम गटातील तर ८९४ तीव्र गटातील कुपोषित बालके आढळून आली. तर मे महिन्यात केलेल्या तपासणीत मध्यम गटातील ५ हजार ९१९ तर तीव्र गटातील ८३६ कुपोषित बालके आढळून आली आहेत.   महत्त्वाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्य़ातील कुपोषणच्या प्रश्नाला माध्यमांनी गेल्या डिसेंबर महिन्यात वाचा फोडली होती. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी उपाययोजनेअंतर्गत नाविन्यपुर्ण योजना उपक्रमासाठी २५ लाख रुपयांचा तर आदिवासी उपयोजना अंतर्गत ५० लाख रुपये असा एकूण ७५ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजुर केला होता. या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत ग्राम बाल विकास केंद्र आणि बाल उपचार केंद्र पुन्हा कार्यान्वयित केली जाणार होती. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी २१ दिवस तीव्र कुपोषित आणि कुपोषित बालकांना दाखल करण्यात येणार होते. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत उपचार केले जाणार आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकि त्सक यांची या उपक्रमावर देखरेख असणार होती, यात श्उऊउ अंतर्गत १२०० रुपये प्रति बालक प्रति महिना तर उळउ अंतर्गत ५२५० प्रति बालक प्रति महिना खर्च केला जाणार होता. या उपाययोजनांनतर जिल्ह्य़ातील कुपोषणाचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र व्यापक उपाययोजनांतरही कुपोषणाचे प्रमाण फारसे घटले नसल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण ५१३ ने तर तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण ५५ ने कमी झाल्याचे महिला बाल कल्याण विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. रायगड जिल्ह्य़ातील कर्जत, खालापुर, सुधागड पाली, पेण आणि अलिबाग तालुके हे आदिवासी बहुल तालुके म्हणून ओळखले जातात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malnutrition in maharashtra
First published on: 18-06-2017 at 02:37 IST