अलिबाग : उसने घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून एकाची गळा दाबून हत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथे घडली आहे. अमित प्रफुल्ल वाघ असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमित याने कोपरी-कुर्डूस येथील व्यक्तींकडून उसने पैसे घेतले होते. ती रक्कम परत दिली नाही. त्याचा राग धरून चंद्रकांत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे यांनी अमित वाघ याच्या घरी रात्री जाऊन उसने दिलेल्या पैशाची मागणी केली. त्यावेळी वाघ आणि म्हात्रे यांच्यात शाब्दीक वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचला. त्या दोघांनी शिवीगाळी करीत हाताबुक्क्याने व लाथेने मारहाण केली. त्यानंतर त्याला घरातून बाहेर पडवीमध्ये खेचत आणले. त्यानंतर चंद्रकांत याने अमितची मान दाबली.

हेही वाचा >>> पूर्वीच्या वादातून सशस्त्र हल्ल्यात तरुण ठार, महिलेसह सहा जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षयने अमितच्या गुप्तांगावर लाथ मारून पुन्हा त्याला मारहाण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. ही घटना कातळपाडा येथे अमित वाघ याच्या घरात रात्री पावणे बाराच्या दरम्यान घडली. झालेल्या दुखापती मध्ये अमितचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर दोघेही पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोयनाड पोलीस घटना स्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. दोघांचा शोध सुरू केला. अखेर गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान त्यांना पकडण्यात यश आले. याप्रकरणी खून करणाऱ्या चंद्रकांत म्हात्रे व अक्षय म्हात्रे यांच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.