सोलापूर : स्वस्त दरात अर्धा किलो सोने खरेदी देण्याचे आमीष दाखवून एका तरूणाला बेदम मारहाण केली आणि त्याच्याकडून दीड लाखाची रोकड लुटल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील पांडे गावात घडला. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांतील चौघाजणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर रामराव टेकाळे (वय ३५, रा. चिखलठाणा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार काही दिवसांपूर्वी एका यात्रेत त्यांच्याशी एका महिलेची ओळख झाली होती. त्या महिलेने आपल्याकडे आर्थिक अडचणीमुळे अर्धा किलो सोने असून ते स्वस्त दराने विकायचे आहे, असे सांगितले. हे सोने खरेदी करण्याची गळ घातली. त्यानुसार त्या महिलेने विकायचे म्हणून आणलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने दाखविले. ते शुद्ध असल्याची खात्री पटल्याने स्वस्त दरात सोने खरेदी करण्याच्या आमिषाला ते बळी पडले.
ठरलेल्या दिवशी संबंधित महिलेने ज्ञानेश्वर टेकाळे यांना करमाळा येथे एसटी बस स्थानकावर बोलावले. त्याप्रमाणे टेकाळे हे आपले मित्र सतीश काळे यांना सोबत घेऊन करमाळ्यात आले. तेथे संबंधित महिलेची भेट झाल्यानंतर सोने खरेदीसाठी आपण दीड लाख रुपये घेऊन आल्याचे टेकाळे यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने टेकाळे व त्यांच्या मित्राला पांडे गावात एका घरी नेले. तेथे झाडी झुडपात टेकाळे यांची संबंधित महिलेच्या साथीदारांनी भेट घेतली. परंतु त्यांनी सोने खरेदीसाठी आणलेल्या दीड लाख रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली आणि टेकाळे यांना बेदम मारहाण करून त्यांना हुसकावून लावले.
दरम्यान, करमाळा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटलेली दीड लाख रुपयांची रक्कम जप्त केली. अटकेतील तिघांना पोलीस कोठडी मिळाली आहे.