दसरा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्क मैदान (शिवतीर्थ) मिळावे यासाठी गेल्या वर्षी शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटांमध्ये चांगलीच जुंपल्याने मुंबईत तणाव वाढला होता. त्यामुळे यंदा ठाकरे गटाने दीड महिना आधी परवानगीकरिता मुंबई महापालिकेला पत्र दिले आहे. ठाकरे गटाच्या पत्रानंतर शिंदे गटाने पत्र दिले असल्याचे समजते. यावरून पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मोठा दावा केला आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेनेत फूट पडली. यामुळे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट तयार झाले. दोन्ही गट शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हासाठी अडून होते. दरम्यान, दसरा मेळाव्याचा वाद निर्माण झाला. मुंबई पालिकेने हा निर्णय देण्यास उशीर केल्याने ठाकरे गट उच्च न्यायालयात गेला. परिणामी उच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने कौल देऊन ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. दरम्यान, आता असाच वाद यंदाही निर्माण झाला आहे.

यंदा तर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला जाईल, असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पत्र रेकॉर्डवर घुसवण्याचा प्रयत्न

“ठाकरे गटाकडून सात ऑगस्टला मुंबई पालिकेला पत्र लिहिलं होतं. आम्ही पत्र लिहिल्याचं कळताच त्यांनीही पत्र लिहिलं. परंतु, त्यांनी एक (ऑगस्ट) तारखेला सात (ऑगस्ट) तारखेचं पत्र रेकॉर्डवर घुसवण्याचा प्रयत्न केला. एकंदर पत्राची पूर्ण प्रक्रिया पाहता पत्राचा संदर्भ क्रमांक रजिस्टर केलेला असतो. बाकीच्या सर्व पत्रांत संदर्भ क्रमांक लिहिला आहे. फक्त त्यांच्याच पत्रावर सदा सरवणकर एवढंच लिहिलं आहे. बाकी कशाचाही उल्लेख नाही”, असा दावा अनिल परब यांनी केला आहे.

दोन्ही पत्रांचा संदर्भ क्रमांक तोच कसा?

“एक तारखेचा संदर्भ क्रमांक तोच आहे, सात तारखेचाही तोच आहे. मग, एक ते सात तारखेदरम्यान त्यांनी पत्रव्यवहार केला नाही का? माहितीच्या अधिकारात मी सर्व गोष्टी मागितल्या आहेत”, असंही परब म्हणाले.

स्मरण पत्र का नाही पाठवलं?

“आमचं पत्र आल्यानंतर त्यांनी रेकॉर्डवर पत्र टाकलं आहे. ते तेच पत्र आहे जे सात ऑगस्टला दिलं आहे. एक तारखेला पत्र दिलं असतं तर सात तारखेला स्मरण पत्र पाठवायला हवं होतं”, असंही ते म्हणाले.

…तर कोर्टात जाऊ

ते पुढे म्हणाले की, “आम्हाला परवानगी नाकारली तर आम्ही कोर्टात जाऊ. निकषानुसार परंपरा पाहिली जाते, गेल्यावर्षी कोणाला परावनगी दिली हे पाहिलं जातं. आतापर्यंत जे निर्णय दिले गेलेत त्यानुसार, शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच भाषणं केली आहेत. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळेल याची खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रविवारी घटस्थापना होणार आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीला पाच-सहा दिवस लागतात. त्यामुळे याप्रकरणी लवकरात लवकर पालिकेने निर्णय द्यावा, अशी विनंती आम्ही मुंबई पालिकेला केली आहे”, असंही ते म्हणाले.