शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मराठा आरक्षणाचं वादळ अचानक कसं आलं? असा सवाल तानाजी सावंत यांनी विचारला आहे. तसेच शासनाची दमछाक करून आताच आरक्षण द्या, कागदावर लिहून द्या, अशी भूमिका घेतली जात आहे, अशा शब्दांत तानाजी सावंतांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावर मनोज जरांगेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाचं वादळ अचानक कसं काय आलं? तानाजी सावंतांच्या विधानाबद्दल विचारलं असता मनोज जरांगे म्हणाले, “ते नक्की काय बोलले, हे मी ऐकलं नाही. पण त्यांना नक्की कसलं वादळ दिसलं, हे मला माहीत नाही. पण मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होतंय, हे खरं आहे. त्याला कुणी वादळ समजत असतील आणि त्याविषयी असं बोलत असतील तर ही मराठा समाजासाठी मोठी शोकांतिका आहे. मराठा नेत्यांना मराठा समाजाविषयी प्रेम असलं पाहिजे. त्यांनी एकदा गोर गरीबांच्या घरात जाऊन बघावं. गोर गरीबांचं प्रेम काय असतं? त्यांच्या अडचणी काय असतात, त्यांच्या वेदना काय असतात? हे त्यांना कळेल.

हेही वाचा- महापालिका अन् ‘बेस्ट’ कर्मचारी अद्याप दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत; आदित्य ठाकरेंकडून सरकारवर टीका

कायदावर लिहून द्या, अशी भूमिका घेतली जाते, पण आरक्षण टिकणं महत्त्वाचं आहे, या तानाजी सावंतांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता मनोज जरांगे पुढे म्हणाले, “आरक्षण कसं द्यायचं, ते सरकारला कळतं. तुम्ही काही ज्ञान पागळण्याची गरज नाही. टिकणारं आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं, हे सरकारला कळतं आणि आरक्षण घ्यायचं की नाही घ्यायचं, हे मराठ्यांना सगळं कळतं. मराठ्यांना वेड्यात काढून स्वत: खूप शहाणे आहेत, असं दाखवायची गरज नाही.”

हेही वाचा- राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; कृषीमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला ते सर्वोच्च न्यायालयात का टिकवता आलं नाही? असं प्रश्नही मंत्री सावंत यांनी विचारला होता. यावर मनोज जरांगे म्हणाले, “ते तुम्हीच विचारा ना. तुम्हाला फक्त बाकीच्या गप्पा मारता येतात का? तेही बघा ना जरा… श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांजवळ नाही दाखवायची. ती तुमच्याजवळच ठेवायची. तुमची मस्ती तिकडेच दाखवायची. आरक्षण का टिकलं नाही, याचा शोध तुम्हीच घ्यावा आणि मराठा समाजाला सांगावं. उगीच मस्तीतल्या गप्पा कशाला मारायच्या.”