Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं असून उपचारांसाठी ते छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहेत. मुंबईवरून परतताच रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार असतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉ. विनोद चावरे यांनी काय माहिती दिली?

“उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना किमान दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असल्याचही डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. उपोषणामुळं मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड थकवा जाणवत आहे.” तसेच त्यांची स्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली आहे. “मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो”, अशी माहिती देखील विनोद चावरे यांनी दिली.

मनोज जरांगेंच्या लढ्याला यश

मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली होती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी करत हैदराबाद आणि सातारा गॅझेटचीही मागणी केली होती. यासह, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी केली होती. राज्य शासनाच्यावतीने आज मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच, सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी मागितला आहे.

मनोज जरांगेंनी काय म्हटलं?

“महाराष्ट्रात मराठ्यांचा विजय झाला आहे. आज मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचं कल्याण झालं आहे”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांचे आभार मानले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला आहे. तसेच मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचं सांगत आंदोलन यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या आहेत.