लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. मात्र, महायुतीच्या काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्याप जाहीर झालेली नाही. महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. यातच शिवसेना आणि भाजपामध्ये येथील जागा लढविण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे महायुतीकडून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करत छगन भुजबळ यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा देत आहेत. काही दिवस त्यांनी उपोषण, आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध करत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला होता. यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु होते. दरम्यान, आता नाशिकमधून छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना इशारा दिला आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणतात, “मी कशाला पक्षाचं वर्चस्व वाढवू?” तीन दिवसांपूर्वीच पक्षप्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांचं विधान चर्चेत!

मनोज जरांगे काय म्हणाले?

मनोज जरांगे आज पुण्यातील देहू दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मराठा समाजाने कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे हे त्यांनी ठरवावे.” यावेळी छगन भुजबळ यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “छगन भुजबळ यांच्याबाबत जास्त काही विचारु नका. त्यांनी लोकसभा लढावायचे ठरविल्यानंतर तेथे काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो”, असा अप्रत्यक्ष इशारा मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना दिला.