राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू असतानाच राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याने राज्यात खळबळ उडाली. यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी (८ सप्टेंबर) जालन्यात पत्रकार परिषद घेत आत्महत्येच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

मनोज जरांगे म्हणाले, “मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला आवाहन करतो. या आंदोलनाला सगळ्या मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. वाढता पाठिंबा बघून आपल्याला यश येण्याची शक्यता जास्त आहे. मराठा समाजाने आंदोलनं करावीत, पाठिंबा वाढवावा. परंतू कुठेही गालबोट लागेल असं आंदोलन कुणीही करू नये, असं मी हात जोडून आवाहन करतो.”

“कुणीही आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलू नये”

“ज्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे आरक्षण पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी अथवा मराठा तरुणांनी कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये. कुणीही आत्महत्या करण्यासारखा प्रकार करू नये. त्याचं कारण आम्ही इथं तुम्हाला न्याय देण्यासाठी जीवाची बाजू लावतो आहे. असं असताना तुम्ही असले काही प्रकार केले, तर मग आम्ही हे आरक्षण नेमकं कुणाला द्यायचं?” असा सवाल मनोज जरांगेंनी विचारला.

हेही वाचा : “मनोज जरांगे पाटील अत्यंत फकीर माणूस, मी जेव्हा…”; अण्णा हजारेंचा उल्लेख करत राऊतांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर त्या आरक्षणाचा फायदा कोण घेणार”

“तुम्ही आहात, शिक्षण घेणार आहात, तुमचं भविष्य घडणार आहे म्हणून आम्ही हा मराठा आरक्षणाचा लढा लढत आहोत. त्या मिळालेल्या आरक्षणाचा किंवा आत्ता मिळालेल्या विजयाचा फायदा प्रत्येक मराठ्याच्या घरातील तरुणाने, विद्यार्थ्याने उचलला पाहिजे म्हणून आमचा हा अट्टाहास आहे. पण तुमच्यातीलच काही लोक जीवन संपवण्यासारखे वेगळे निर्णय घ्यायला लागले, तर त्या आरक्षणाचा फायदा कोण घेणार,” असंही जरांगेंनी नमूद केलं.