बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ‘येवल्याचा येडपट’ म्हणत हल्लाबोल केला. एकदा आरक्षण मिळूदे तुला हिसकाच दाखवतो. खूप दिवस झालं तुझी फडफड चालू आहे, असं एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.

जरांगे-पाटील म्हणाले, “कुणी म्हणत हॉटेल जाळलं, घरे जाळली. पण, शांततेत असलेल्या मराठ्यांवर खोटा डाग लावला गेला. यांनी यांचेच हॉटेल जाळले. निष्पाप तरूणांना गुंतवण्याचं काम सरकारनं केलं. मात्र, मराठ्यांना शांतता हवी आहे.”

हेही वाचा : “२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण”, बीडमधून जरांगे-पाटलांची मोठी घोषणा

“येवल्याच्या येडपाटानं बीडमधील पाहुण्याचं हॉटेल जाळलं. सरकारही भुजबळांचं ऐकत आहे. छगन भुजबळ आता ‘जरांगे साहेब’ म्हणत आहेत. भुजबळांना समज दिल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं. मी गप्प बसलो. नंतर मी म्हाताऱ्याला काहीही बोललो नाही. आता येडपट माझी शाळा काढत आहे. याला कुणी मंत्री केलं? हा महाराष्ट्राचा कलंक आहे,” अशी टीका जरांगे-पाटलांनी छगन भुजबळांवर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमच्याविरोधात भूमिका घेऊन आरक्षणात आडकाठी आणणार असाल, तर शहाणे व्हा. मराठा समाजाला ताटकळत ठेऊ नका. नाहीतर शांततेत तुमचा सुफडा साफ केला जाईल,” असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.