Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर त्यांनी ठाण मांडलं असून आज (२ सप्टेंबर) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो मराठा आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली एक उपसमिती गठित केली आहे. या समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जरांगे यांच्या काही प्रमुख मागण्या मान्य करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर विखे पाटील, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आझाद मैदानातील उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत विखे यांनी जरांगे यांना त्यांच्या मागण्या मान्य करत असल्याची माहिती दिली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेले निर्णय मनोज जरांगे यांनी सर्व आंदोलकांसमोर वाचून दाखवले.

…तर ९ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करू : मनोज जरांगे

हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं. हीच जरांगे व त्यांच्या समर्थकांची प्रमुख मागणी होती. “सरकारने यासंबंधीची अधिसूचना काढली की मी उपोषण मागे घेईन आणि सर्व आंदोलकांना आम्ही आमच्या गावी परत घेऊन जाऊ”, असंही जरांगे यांनी यावेळी सर्व मंत्र्यांसमोर जाहीर केलं. सरकारने अधिसूचना काढताच रात्री ९ वाजेपर्यंत आम्ही मुंबई रिकामी करू, असं आश्वासनही जरांगे यांनी यावेळी दिलं.

अधिसूचना घेऊन या लगेच मुंबई सोडतो : मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मी तुम्हा सर्व मंत्र्यांचं मराठा समाजाच्या वतीने कौतुक करतो, आभार मानतो. आजवर कोणालाही या लढ्यात जितकं यश मिळालं नाही तितकं यश गरिबाच्या पोरांना मिळालं आहे. सरकारने अधिसूचना काढल्यानंतर आमचा आनंद गगनात मावणार नाही. अंमलबजावणीचा आदेश व संबंधित अधिसूचना काढल्यानंतर आम्ही नाचत नाचत मुंबईतून बाहेर पडू, गुलाल उधळू. तुम्हालाही गुलाल लावू. तुम्ही अधिसूचना घेऊन या, आम्ही तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहोत.”

यावेळी मनोज जरांगे सर्व आंदोलकांना उद्देशून म्हणाले, “जिंकलो रे…राजाहो! तुमच्या सर्वांच्या ताकदीवर जिंकलो.”