गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. राज्य सरकारकडून वारंवार मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचा ठराव पारित केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, जोपर्यंत हातात प्रमाणपत्र पडत नाही, तोपर्यंत मी हटणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.

“संभ्रम निर्माण करू नका”

“आम्ही उपोषण मागे घेतलेलं नाही. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आंदोलन थांबणार नाही. फक्त त्यांच्या ठरावात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही दुपारी बैठक घेत आहोत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. आपलं सगळं समाजासमोर पारदर्शी आहे”, असं जरांगे पाटील म्हणाले.

सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास…”

“त्यांच्या ठरावावर मी ऐकणार आहे का?”

“काल त्यांनी काय चर्चा केली ते मला बघायचं आहे. स्वातंत्र्यापासून एकतर सगळे पक्ष या मुद्द्यावर एकत्र येत नव्हते. आता आलेत तर आपणही थोडं सकारात्मक बोललं पाहिजे. विरोध करताना दणकून विरोध केला आपण. बघुयात त्यांचा काय ठराव आहे. मी जर त्यांचे तीन जीआर परत पाठवू शकतो, तर मग ठरावावर मी ऐकणार आहे का? आता महाराष्ट्रातला मराठा हुशार आहे. पक्कं काही बघितल्याशिवाय माघारी जात नाही आता”, असा निर्धार जरांगे पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही निश्चिंत घरी झोपा, मी बसलोय”

“मला ठराव बघायचा आहे. मला व समाजाला पटला तर आम्ही दोन वाजता बघू काय निर्णय घ्यायचा. पण निर्णय समाजाच्या हिताचा असेल, आंदोलन मागे घेणार नाही. ज्या दिवशी समाजाच्या हातात आरक्षणाचं प्रमाणपत्र पडेल, त्या दिवशी मी आंदोलन मागे घेईन. तोपर्यंत नाही. मी ताणून धरलं आहे. महाराष्ट्रानं बेफिकीर घरी झोपून राहायचं. हा रात्रीतून बंद करून जाईल वगैरे घाबरण्याचं कारण नाही. अजिबात जात नाही मी. तुमच्या हातात प्रमाणपत्र पडेपर्यंत मी हटत नाही. मग यांनी कितीही बैठका घेऊ द्या, कितीही ठराव करू द्या”, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.