Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू होतं. आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता. या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आहे.
राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. उपोषण सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की, माझ्या समाजाचं कल्याण झालं असं सांगत सर्व आंदोलकांनी आता मुंबईतून पुन्हा आपआपल्या गावी जाताना शांततेत जावं असं आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे.
मनोज जरांगेंनी काय म्हटलं?
“महाराष्ट्रात मराठ्यांचा विजय झाला आहे. आज मराठा समाजासाठी सोन्याचा दिवस आहे. माझ्या समाजाचं कल्याण झालं आहे”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांचे आभार मानले आहेत.
राज्य सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या?
हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी, आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना नोकरी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य, मराठ्यांच्या ५८ लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत लावणार, वंशवळ समिती गठित करणे, सगेसोयऱ्यांची छाननी करण्याचा मुद्दा, मराठा-कुणबी एक असल्याचा जीआर दोन महिन्यांत काढण्यात येणार, सातारा, औंध गॅझेटबाबत १५ दिवसांत लागू करण्याचं आश्वासन अशा मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.
आंदोलकांचा जल्लोष
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला आहे. तसेच मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचं सांगत आंदोलन यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या आहेत.