मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मोठा लढा उभा केला आहे. जरांगे-पाटलांच्या लढ्याला काहीप्रमाणात यश मिळालं आहे. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. पण, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जरांगे-पाटलांनी सरकारला दोन महिन्यांची वेळ दिली आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं दिसत आहेत.

छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात भुजबळ एका कार्यकर्त्याला सांगत आहेत की, “काही नाही, ती सगळी मंडळी आली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आता आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतोय आहे, आवाज उठवा. एकटा कुठपर्यंत वेळ काढणार. आता तालुका-तालुक्यातून, गावागावातून ज्या पद्धतीनं बुलडोझर चालवले जात आहेत, त्यामधून ओबीसी काय वाचणार नाही आता.”

हेही वाचा : जरांगे पाटील आणि लेविस गुरुजींचा धडा!

“त्यामुळे आता ‘करेंगे या मरेंगे’ हेच केलं पाहिजे. काय असंही मरतंय, तसंही मरतंय. मी याविरोधात आता उभा राहतोय,” असं भुजबळ कार्यकर्त्याला सांगताना ऐकायला मिळत आहेत. यावर आता मनोज जरांगे-पाटील यांनी भाष्य केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील म्हणाले, “मी पूर्ण ऑडिओ क्लिप ऐकली नाही. पण, ‘करेंगे मरेंगे’ हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राज्यात अशांतता पसरवायची असेल. पण, आमचं ‘लढेंगे आणि जितेंगे’ हेच वाक्य आहे. आम्ही शांततेत आंदोलन करणार. आमचे आंदोलन थांबणार नाही.”

हेही वाचा : “…तरच जरांगे-पाटील सरकारला वेळ वाढवून देतील”, बच्चू कडू यांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कितीही एकत्र आले, दडपण आणण्याचा प्रयत्न केला आणि ताकदीनं मराठ्यांविरोधात उभे राहण्याचा प्रयत्न केला, तरीही आमचं लक्ष विचलित होणार नाही. मराठा आरक्षण मिळवणे हेच आमचं लक्ष आहे,” असा एल्गार जरांगे-पाटलांनी केला आहे.