राज्यातील सत्ताधारी मनोज जरांगे-पाटील यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर झुलवत आहेत. सत्ताधाऱ्यांचे केवळ वेळकाढू धोरण असून एकदा निवडणुका झाल्यावर हे आंदोलन चिरडण्यात येईल. त्यामुळे जरांगे-पाटलांनी आंदोलनासह राजकीय भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. यावर मनोज जरांगे-पाटील यांनी भूमिका मांडली आहे.

नेमकं प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“सत्ताधाऱ्यांच्या वतीने आमदार बच्चू कडू यांना मध्यस्थीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आले. मात्र, तोडगा निघू शकला नाही. मनोज जरांगे-पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने सरकारचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी. त्यांनी केवळ पाठिंबा देण्यापुरतेस मर्यादित न राहता निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. ते सहज लोकसभेत पोहोचू शकतील. मराठा आरक्षणासाठी आंदोलनासोबतच त्यांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे. याचा गांभीर्याने विचार त्यांनी करायला हवा,” असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं.

“मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा”

यावर जरांगे-पाटील म्हणाले, “प्रकाश आंबेडकर सत्य आणि निर्भिड बोलतात म्हणून मी त्यांचे सल्ले मानतो. पण, सध्या मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे. मराठ्यांच्या मुलांना आरक्षण देणं हा प्रश्न आमच्यासमोर आहे. प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या पाठीशी जनतेला उभं करावं.”

“मराठा आरक्षण मिळवणारच”

“महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्र्यांनीही मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहावं. सत्ताधारी आणि विरोध मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीतर आम्ही लढण्यास सज्ज आहोत. आरक्षण मिळवणारच,” असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळालं नसतं”

“मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठे आणि मराठेच दिसणार आहेत. प्रत्येकानं राजकीय स्वार्थासाठी मराठा समाजाचा वापर करून घेतला आहे. मात्र, गोरगरीब तरूणांसाठी कुणीही समोर येण्यास तयार नाही. ५४ लाख नोंदी सापडूनही सरकार आरक्षण देत नाही. ही घोर फसवणूक आहे. काहीच पुरावे नसते, तर मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळालं नसतं. नुसते मोर्चे आणि आंदोलनच करत राहिलो असतो,” असंही जरांगे-पाटलांनी म्हटलं.