गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावरून संघर्ष सुरू आहे. त्यातच रविवारी ( ७ जानेवारी ) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना ओबीसीतून आरक्षण न घेता आरक्षणाचं वेगळं ताट घ्यावं, असा सल्ला दिला होता. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे-पाटील यांनी भाष्य केलं आहे. “ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
“जरांगे-पाटलांच्या निमित्तानं नवीन नेतृत्व तयार होत असेल, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण, जरांगे-पाटलांना सांगितलं पाहिजे, आमच्या ताटात येऊ नका. तुम्हाला आरक्षणाचं वेगळं ताट पाहिजे असेल, तर आम्ही त्याला मदत करतो,” असं विधान प्रकाश आंबेडकरांनी नांदेडमधील ओबीसी मेळाव्यात केलं होतं.
हेही वाचा : “तू कारवाई कर, तेव्हा…”, एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांचं अजित पवारांना आव्हान
“वेगळं आरक्षण घेणं, म्हणजे…”
यावर मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “आमच्या मतावर आम्ही ठाम आहोत. आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार. कारण, मराठा समाजातील अनेकांच्या ओबीसीतून नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे वेगळं आरक्षण घेणं, म्हणजे स्वत:च्या लोकांना फसवल्यासारखं आहे.”
हेही वाचा : “महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कुणीतरी घडवतंय, हे…”, राज ठाकरेंनी व्यक्त केली शंका
“ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत”
“५० ते ६० लाखांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण आहे. हक्काचं ओबीसी आरक्षण सोडून दुसरं ताट देणं म्हणजे फसवणूक आहे. ते मराठा समाजाकडून शक्य नाही. ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत,” असं मनोज जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.