मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक युद्ध अद्यापही संपलेलं नाही. दोघेही वेगवेगळ्या जाहीर सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. एकमेकांच्या टीकेला प्रत्युत्तर देतात. त्यामुळे हे वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज (९ डिसेंबर) इंदापूर येथे झालेल्या सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर शरसंधान साधले. हिंदी भाषेसह त्यांच्या एकूण कार्यकौशल्यावर छगन भुजबळांनी टीका केला. त्या प्रत्येक टीकेवर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे म्हणाले, आम्ही त्यांच्याविरोधात बोलायचं आणि नाव घेण्याचं बंद केलं आहे. रात्रंदिवस आम्ही कार्यक्रम घेत असलो तरीही सरकार आणि प्रशासनाचं जे काम शांतता राखण्याचं काम असतं ते आम्ही करतो. गरीब गावगाड्यातील लोक आताही आम्ही एकत्र आहोत. यांचं स्वप्न आहे की दंगल घडवून राजकीय फायदा उचलायचा. परंतु, मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा, कारण जातीय तेढ निर्माण होऊ नाही द्यायचा.
हेही वाचा >> “हमारे दुःख पर मीठ क्यूँ चोळते हो?” म्हणत छगन भुजबळांनी केली मनोज जरांगे पाटील यांची नक्कल
दाखल्यांवर स्टे आणता येत नाही
नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या कुणबी दाखल्यांवर स्टे आणा अशी मागणी छगन भुजबळांनी केली. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, दाखला दिल्यावर त्यावर स्टे आणता येत नाही. शासकीय नोंदी रद्द होत नसतात. त्या नोंदी रद्द केल्या तर सगळ्या नोंदी रद्द कराव्या लागतील. मंत्री झालात म्हणून कायद्याचा गैरवापर करत आहेत. हे स्वतः हॉटेले जाळतात आणि गरिबांना अडकवून गुन्हे दाखल करतात. परंतु, ते म्हणतात तसं नोंदी रद्द होणार नाहीत.
अधिवेशनातच कायदा होणार
मनोज जरांगेंनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातच मराठा कायदा पारित होईल, असा विश्वास जरांगेनी व्यक्त केला. ते म्हणाले, अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा कायदा पारित होणार. २४ डिसेंबरपर्यंत वेळ घेतला आहे. त्याच्या आत आरक्षण मिळणार. कायदा पारित करायला आधार लागतो. शासकीय नोंदी मिळाल्या आहेत. जर, आरक्षण मिळालं नाहीतर आम्ही लढायला सज्ज आहोत.
भुजबळांना मोडायचाच नाद
“मनोज जरांगे पाटील अकलेने दिव्यांग आहेत”, अशी टीका छगन भुजबळांनी केली होती. त्यावर जरांगे म्हणाले, तुम्हाला माहितेय की कोण कमी आहे. ते अकलेने आमदार महापौर झाले नाहीत. तुम्हाला मराठ्यांना बसवलं पदावर. ज्यांनी ज्यांनी पदावर बसवलं त्यांना पायाखाली तुडवलं. त्याने शिवसेना मोडली, राष्ट्रवादी मोडली. अजून बऱ्याच गोष्टी मोडल्या. आमची मराठ्यांची जात मोडली, ओबीसींच्या जातीही मोडल्या. ओबीसी महामंडळातील ८० टक्के एकट्याने खालले आहे. तुला मोडायचाच नाद आहे. तुम्ही विकलांग आहात ते सगळ्यांना माहित आहेत. त्याला फक्त शब्दांचा खेळ करता येतो. धनगर बांधवांचा मोठा समुदाय असून त्यांच्या आरक्षणाबाबत तो भूमिका स्पष्ट करत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा >> “गाढव पाण्याच्या टाकीवर चढवलं कुणी?”, ‘ती’ गोष्ट सांगत छगन भुजबळ यांची मनोज जरांगेंवर बोचरी टीका
मनोज जरांगे सरपंच होणार का?
मनोज जरांगेंचा १९८५ मध्ये त्याचा जन्म झाला. त्यावेळेला मी मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही झालो. एक नाही दोन पदं भुषवली. मी देशाच्या महापौरांचा अध्यक्षही झालो. अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव, असं आव्हान छगन भुजबळांनी आज दिलं. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, मला सरपंच व्हायचं नाही. तू तर जेलमध्येही जाऊन आलास. कारण तू तुझं पाप फेडत आहेस.
गाढवाच्या उदाहरणावर जरांगे काय म्हणाले?
आजच्या भाषणात छगन भुजबळांनी एका गाढवाचीही गोष्ट सांगितली. “गाढवाला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण? आता सगळे डोक्याला हात लावून बसले याला कसं खाली काढायचं? अरे याला तुम्ही वरती नेलं तेव्हा काही बोलला नाहीत आता डोक्याला हात लावून बसले”, असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर जरांगे म्हणाले, त्यांनी स्वतःलाच गाढवाची उपमा दिली. ते स्वतःलाच गाढव म्हणातात.