Manoj Jarange Patil vs Ajit Pawar on Maratha Reservation : “अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात (राष्ट्रवादी) साप पाळले आहेत” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे नेते मराठ्यांविरोधात असल्याची टिप्पणीही जरांगे यांनी केली आहे. या पक्षाने मराठ्यांविरोधात मोठं षडयंत्र रचलं असून छगन भुजबळ त्यामध्ये आघाडीवर आहेत असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचा रोख छगन भुजबळ व बीडमधील ओबीसी मोर्चाकडे होता.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “छगन भुजबळ बावचळले आहेत, हतबल झाले आहेत. ते मराठ्यांना शत्रू मानत आहेत. त्यामुळे ज्या जाती कधीच मराठ्यांविरोधात नव्हत्या त्यांना मराठ्यांविरोधात फितवण्याचं काम करत आहेत. त्या बदल्यात भुजबळ त्यांना खोटी आश्वासनं देतं आहेत. मराठ्यांच्या पोरांचं कसं वाटोळं होईल हे पाहत आहेत. मात्र, आम्ही आता भुजबळांना महत्त्व देणं बंद केलं आहे. छगन भुजबळ जे काही करत आहेत त्याकडे अजित पवार डोळेझाक करत आहेत.”

मराठ्यांविरोधात अजित पवारांचं षडयंत्र : मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) बहुतेक नेते मराठ्यांविरोधात काम करत आहेत. आता बघा, सगळीकडचे नेते उठतात आणि बीडमध्ये एकत्र जमतात. बीडमध्ये मराठ्यांविरोधात मोर्चे काढतात. आता बीडमध्ये मराठा समाजाविरोधात जो मोर्चा काढला जाणार आहे तो मोर्चा देखील अजित पवार पुरस्कृत असेल. त्या मोर्चाला सगळे त्यांचेच नेते असणार. या मोर्चाला पदाधिकारी देखील त्यांचेच असतील. हे मराठ्यांविरोधात चाललेलं अजित पवार यांचं षडयंत्र आहे.

“अनेक नेते अजित पवारांच्या तोंडावर गोड बोलतात, टाळी देऊन बोलतात. ते पाहून अजित पवारांना वाटतं हे आपले जवळचे लोक आहेत. परंतु, अजित पवार यांनी साप पोसले आहेत हे लक्षात ठेवा. एक दिवस आमचे शब्द खरे ठरतील. तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल. हे साप मराठ्यांचे शत्रू आहेत.”

मनोज जरांगेंची विजय वडेट्टीवारांवर टीका

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ओबीसींच्या आंदोलनाच्या नावाखाली विजय वडेट्टीवार यांना राजकारणात स्वतःचं बस्तान बसवायचं आहे. दिल्लीचा लाल्या त्यांना सांगतो की मराठ्यांना टार्गेट करा. परंतु, त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.ओबीसींच्या नावाखाली काँग्रेस मोर्चा काढणार आहे. परंतु, विदर्भातील मराठे व कुणबी त्यांना दणका देतील. आरक्षणाच्या विरोधात जाणाऱ्यांना हिसका दाखवण्या सुरुवात झाली आहे.”