Manoj Jarange Patil vs Chandrakant Patil on Maratha Reservation Protest : कुणबी नोंदींसह मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारपासून (२९ ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. राज्यभरातून हजारो लोक त्यांच्याबरोबर मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत हे आंदोलन राजकीय आरक्षणासाठी चालल्याची टीका केली आहे. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “त्या चंद्रकांत पाटलांना सांगा, मधल्या काळात त्यांनी आमच्या पोरांची चांगली कामं केल्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायचं कमी केलं होतं. आताही नीट राहा. चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष असताना त्यांनी काय केलं होतं ते आम्हाला माहिती आहे. त्यांनी आमच्या व्हॅलिडिटी रोखल्या होत्या. कुणबी जातप्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचं काम थांबवलं होतं हे आमच्या लक्षात आहे.

मनोज जरांगे यांचा चंद्रकांत पाटलांना इशारा

मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील म्हणाले, “चंद्रकांत पाटलांना सांगा, मराठ्यांबद्दल बोलू नका नाहीतर अवघड होईल. मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका. इथून पुढे मराठा आरक्षणाविरोधात बोलू नका. जास्त वचवच नको. तुम्ही फार काही लांब नाही. कोल्हापूर म्हणजे आमच्या राजघराण्याच्या कचाट्यातच आहे.”

चंद्रकांत पाटलांनी मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये : मनोज जरांगे

“चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या शिव्या खाऊ नयेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आमच्या जातीच्या दाखल्याच्या पडताळणी रोखून धरल्या होत्या. त्यांनी जास्त बडबड करू नये, नाहीतर अवघड होईल.”

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाला १० टक्के एसईबीसी/ईडब्ल्यूएस आरक्षण आहे. या १० टक्के एसईबीसी आणि पूर्वीच्या ईडब्ल्यूएसमध्ये सर्वकाही होते, त्यामध्ये काय नव्हते सांगू तुम्हाला, त्यात राजकीय आरक्षण नव्हते. आता जी सगळी धडपड चालू आहे ती राजकीय आरक्षणासाठी चालू आहे.”