Manoj Jarange : महाराष्ट्रात गणरायाच्या आगमनाची तयारी झाली आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी आता मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली. २९ ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत जायचं असा निर्धार मनोज जरांगेंनी केला. आज पत्रकार परिषदेतही मनोज जरांगेंनी मुंबईत जाणार आणि आरक्षण घेणारच असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता त्यावर काय बोलणं झालं हेदेखील मनोज जरांगेंनी सांगितलं.

काय म्हणाले मनोज जरांगे?

“तुम्ही आरक्षण न दिल्यास मी सरकारसुद्धा उलथवून टाकू शकतो…मी सोडत नसतो”, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. त्यानंतर जरांगे म्हणाले, “अंतरवली सोडल्यावर मी कोणत्याचं मंत्र्याचं ऐकणार नाही. दोन महिन्यापूर्वी मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मला गरीब मराठ्यांच्या वेदना तुमच्या पुढे मांडायच्या आहेत, तुम्ही अंतरवालीत या, असं मी देवेंद्र फडणवीसांना म्हणालो होतो, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसतील तर आडमुठे कोण हे मुंबईकरांनी सांगावं”, असं मनोज जरांगे म्हणाले.

राज्यातील मराठ्यांना जरांगेंनी काय आवाहन केलं?

राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करा, व्यवसाय बंद ठेवा, नोकरदारांनीही काम बंद करा आणि मुंबईकडे निघा. जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं. कोणी शेतीची कारणं सांगू नका. जिथे जिथे टँकर असतील तिथे पाण्याचे टँकर घ्या. समाजातील सर्व डॉक्टरांनी गोळ्या औषध घेऊन या.राजकारण्यांनी त्यांची वाहने द्या, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. मला आंदोलन शांततेत पाहिजे. कोणी जाळपोळ दगडफेक करायची नाही, अशा सूचनाही मनोज जरांगेंनी दिल्या. आपल्या शेजारी जाळपोळ झाली तरी आपण पुढे चालायचं, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या काय?

मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

हैदराबाद गझेटियर लागू करा… १३ महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

आम्हाला कायद्यात बसणारं आरक्षण द्या, अशीही मनोज जरांगेंनी मागणी केली आहे.