सांगली : बीडचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असले तरी जोपर्यंत परळी तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी बदलले जात नाही तोपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवता येणार नाही. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील करून घेतले तर अजितदादांचा पक्षच संपेल, असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत असून, प्रशासनही तितकेच यामध्ये गुंतले आहे. अजितदादांकडे बीडचे पालकमंत्रिपद आहे, तरीही गुन्हेगारी थांबण्याऐवजी सुरूच आहे. यामुळे प्रशासनावर वचक नाही, हे सिद्ध होते. गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर परळी तालुक्यातील प्रशासनात असलेल्या सर्वच कर्मचारी यांच्या बदल्या अन्यत्र करायला हव्यात, तसेच नव्याने आलेले अधिकारी अन्य जिल्ह्यांतून आलेले असावेत, तरच काही प्रमाणात याठिकाणी गुन्हेगारीला आळा बसू शकतो.

महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास विशेष चौकशी पथकाकडून करण्याची मागणी आपण केली. या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत चौकशी पथक नियुक्त केले असून, या पथकाकडून योग्य तो न्याय ज्ञानेश्वरी मुंडे यांना मिळेल, अशी आशा आहे. जे खरेच गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. संशयितांची खरी नावे चौकशी पथकाला देण्यास आपण सांगितले असून, यानुसार तपास सुरू आहे. भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, अशीच आपली भूमिका असून, ती कोणत्या जातीची आहे, याला महत्त्व नाही. अन्याय करणारे यांना शासन झालेच पाहिजे, यासाठीच आपला संघर्ष सुरू आहे.

मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत चर्चा सुरू आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल. त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेले नाही याबाबत ते म्हणाले, तो राजकीय विषय असून, आपणास त्याबाबत काहीच बोलायचे नाही.

मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी सक्रिय होऊन आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, अन्यथा समाजच त्यांना त्यांचे उत्तर देईल, असेही ते म्हणाले. मराठा समाजावर गेली सात पिढ्या अन्याय झाला आहे. गरीब मराठा समाजाची मुले शिकली पाहिजेत, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी, प्रतिष्ठा मिळावी यासाठी आरक्षणाचा लढा सुरू असून, तो अंतिम टप्प्यात पोहचला असल्याचे ते म्हणाले.