जालना : राज्य सरकारने गेल्या २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानंतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा ओघ कमी झाला असल्याचे निरीक्षण ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नोंदवले.
कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात काढण्यात आलेला गेल्या २ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा, चुकीची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावीत, जातनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी ओबीसी आणि भटके व विमुक्त महासंघाच्या वतीने सोमवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यानिमित्ताने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आंबेडकर यांनी वरील निरीक्षण नोंदवले.
यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजप हाच ओबीसींचा खरा राजकीय विरोधक आहेत. हे ओबीसींनी ओळखले पाहिजे. मराठा-ओबीसींमधील वादास भाजप कारणीभूत आहे. ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण स्वतंत्र असले पाहिजे. भाजप हा आपला राजकीय विरोधक असल्याचे ओळखून ओबीसींनी निवडणुकांत त्यांच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केले पाहिजे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या घातपाताच्या संदर्भातील आरोपांच्या बाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, यामागे त्यांच्यातील अंतर्गत मतभेद आणि भांडण आहे. याबाबत त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांवर आरोप आहे. या अंतर्गत वादात धनंजय मुंडे यांचे नाव समाविष्ट केले असावे. कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने गेल्या २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानंतर जरांगे यांच्या आंदोलनाचा ओघ कमी झाला.
पवार ‘ए’ म्हणाले तर अर्थ ‘झेड’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षित जागांवर मूळ ओबीसींना उमेदवारी दिली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले असतील तर त्याचा अर्थ आपण विरुद्ध काढतो. पवार यांचे राजकारण आपण गेली चाळीस वर्षे पाहात असून ते ‘ए’ म्हणाले तर त्याचा अर्थ आपण ‘झेड’ काढतो.
