बीड : मराठवाड्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार नगदी, तर जमीन खरडून गेलेल्यांना हेक्टरी १ लाख ३० हजार रुपयांची तातडीने मदत करण्यासह संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात केली. या वेळी अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर मदतीसाठीची अष्टसूत्रीच त्यांनी मांडली. सामाजिक सौहार्दता जपावी, असे सांगून त्यांनी मराठा समाजाने शासक आणि प्रशासक व्हावे, असे आवाहनही केले.

जरांगे यांनी शेतकऱ्यांना आठ पद्धतीने मदत करावी, अशी मागणी करताना त्याचे टप्पे नमूद केले. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना ७० हजार हेक्टरी नगदी मदत करावी. ज्यांचे पीक व जमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी १ लाख ३० हजार रुपये द्यावेत. जनावरे दगावली, कांदा, सोयाबीन, बाजरी आदी पिके वाहून गेली त्यांना १०० टक्के मदत द्यावी, अशी मागणी केली.

तसेच उसाच्या हप्त्यातून वसूल करणाऱ्या रकमेला विरोध करत जरांगे यांनी नोकरदारांच्या वेतनातील चौथा हिस्सा कापून घ्यावा, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, शेतीला नोकरीचा दर्जा देऊन १० हजार रुपये द्यावेत, अभिनेता शाहरुख खानसह तारे, अभिनेत्रींकडूनही मदत घ्यावी, अजित पवार यांच्यासह राज्यातील विखे, देशमुख, निंबाळकर, राणे, बावनकुळे आदी राजकारणातील घराण्यांकडूनही मदत वसूल करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने मदतीमध्ये चालढकल केली तर शेतकऱ्यांनी यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकही सदस्य निवडून द्यायचा नाही, असे आवाहन जरांगे यांनी केले.

‘आपण काही दिवसांचे पाहुणे’ नारायणगडावरून एखाद्या आंदोलनाची घोषणा होणार का, याचा कानोसा घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोन आल्याचे नमूद करून मनोज जरांगे यांनी स्वत:च्या प्रकृतीवरही भाष्य केले. आपण काही दिवसांचे पाहुणे असल्याचे सांगताना आरक्षणावरून समाजातील काहींकडून होत असलेल्या टीकेवरून खंतही व्यक्त केली. समाजाने जेवढे मिळाले त्यात समाधान मानावे, असे आवाहन केले. भुजबळांवर टीकाही त्यांनी केली. एखादा ओबीसी नेता विरोधात बोलला तर इतरही जातींना दोष न देता मदतीचा भाव ठेवावा, असेही ते म्हणाले.