मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत मोर्चा काढला होता. तसंच त्यांना आरक्षणाचा अध्यादेश मिळाला तेव्हा त्यांनी नवी मुंबईतून आंदोलन मागे घेतलं. तर छगन भुजबळ यांनी ओबीसींचं आरक्षण हे मराठ्यांना दिलं जातं आहे. ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी मागणी छगन भुजबळ यांनी आधीपासूनच केली होती. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी एकेरी शब्दांत छगन भुजबळांवर टीका केली आहे. तसंच छगन भुजबळ यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
काय म्हणाले आहेत मनोज जरांगे पाटील?
“तू ओबीसींचं वाटोळं केलं आहे. आम्ही ओबीसींचं वाटोळं होऊ देणार नाही. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील. मी तुला सांगतो, तू नादी लागू नकोस. गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करु नकोस. मराठे ओबीसी आरक्षणात गेले आहेत. आता हेच ओबीसी बांधव त्याला (छगन भुजबळ) म्हणत आहेत की तू काय कामाचा आहेस? तुला बाहेर निघायची वेळ आली आहे. आम्ही सगळे मिळून तुला बाहेर फेकतो.” असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी एकेरीवर येत पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
भुजबळांनी ओबीसींची वाटोळं केलं
“तू ओबीसींचं वाटोळं केलं आहे, पण आम्ही ओबीसींचं वाटोळं होऊ देणार नाही. तुझं आता वय झालं आहे आणि या वयात एवढा लोड तुला झेपत नाही. तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील” अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळांना इशारा दिला. “गप्प राहा, येडपट माणूस आहे. हे कसं ओबीसींच्या हाताला लागलं, ओबीसींचं वाटोळं करतो आहे.”
हे पण वाचा- “राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतायत”, ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले, “त्यांना पैसे…”
“मला म्हणतो उपोषण करू नको, तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी. तू माझ्या नादी लागू नको, तुझे वय झाले आहे. तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू. तू गप्प बसला तर आम्ही तुझा शंभर टक्के आदर करू. पण जर गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही”, असंही मनोज जरांगेंनी भुजबळांना सुनावलं आहे.